हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

पू. प्रा. सु.ग. शेवडे

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे, आर्य कोण अन् कुठले ?, रामायणकाळ, आद्यशंकराचार्य आणि वास्तव, आर्यांविषयीची थाप, हिंदु संस्कृती अन् परंपरा यांच्या पाऊलखुणा जगभर पसरल्या, हिंदु संस्कृतीला नष्ट करणारी इस्लामी राजवट’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग ५३) प्रकरण ९

भाग ५२. वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835757.html 

४. छत्रपती संभाजी महाराजांविषयी उगवलेला सूड !

या ऐतिहासिक गोंधळात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धादांत खोट्या गोष्टी लोकमानसात प्रसृत होणे ही होय. त्या खोट्या गोष्टी पसरवतांना अनेक खर्‍या, अभिमानास्पद गोष्टींना तिलांजली दिली जाते. मल्हार रामराव चिटणीस या माणसाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी केवळ दुष्टबुद्धीने लिहिले. बाळाजी आवजी चिटणीस यांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. त्याचा सूड म्हणून मल्हार याने धादांत खोटे चरित्र प्रसृत केले. त्यात त्याने म्हटले की,

अ. संभाजी राजे व्यसनी होते. अशा व्यसनात झिंगलेले असतांना ते मोगलांच्या हाती लागले.

आ. कवी कलश हा मोगलांना फितूर होता. त्याने शंभूराजांना पकडून दिले.

इ. संभाजी स्त्रियांविषयी विकृत बुद्धीचा होता.

ई. रायगडावर एका हळदी-कुंकवाच्या प्रसंगी एका तरुणीला त्याने ओढून नेऊन दुराचार केला.

उ. संभाजीच्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्याचा रथ मोडला.

ऊ. त्या दिवशी गर्दीमध्ये सहस्रो ब्राह्मण चिरडून मरण पावले.

ए. शिवाजी महाराजांनी संभाजीला पन्हाळ्याला कारागृहात ठेवले होते.

ऐ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संतापून संभाजीने सोयराबाईंना भिंतीत चिणून मारले. अनेक लोकांना हत्तीच्या पायी दिले.

ओ. न्यायाची रीत राहिली नाही. देवाब्राह्मणांच्या ठायीही निष्ठा राहिली नाही.

औ. शिर्काण म्हणजे सर्व शिर्के यांची कत्तल केली.

अशा ५ – ५० थापा त्याने मारल्या आहेत.

५. मल्हार रामराव चिटणीस आणि इतिहासकार दोषी असतांना सत्यशोधन कसे होणार ?

लोकमानसात मात्र छत्रपती संभाजी महाराजांची हीच प्रतिमा पक्की झाली आहे. त्यावर कवींनी आपल्या कविता, नाटककार यांनी नाटकांचे आणि चित्रपटकारांनी चित्रपटांचे इमले (बंगले) उभारले आहेत. आपल्या राष्ट्रासाठी असामान्य बलीदान केलेल्या वीरांविषयी असल्या नीच, खोट्या आणि दुष्ट कल्पना प्रसृत करणारा मल्हार रामराव चिटणीस हा याविषयी दोषी आहेच; पण सत्याचे सखोल संशोधन न करता ही विटंबना मान्य करणारे इतिहासकारही तितकेच दोषी आहेत. नाटककार, चित्रपटनिर्माते, कवी इत्यादी ललित साहित्यिकांकडून सत्यशोधनाची अपेक्षा कशी करावी ?

५ अ. हे आहे छत्रपती संभाजीराजे यांचे खरे स्वरूप ! : संभाजीराजे व्यसनी नव्हते. स्त्रियांशी दुर्वर्तन करत असल्याचा कोणताही पुरावा नाही. ते संस्कृत आणि हिंदी भाषांमध्ये निपुण होते. राजनीतीवर ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला असून ‘सातसतक’, ‘नखशिख’ आणि ‘नाईकाभेद’ हे ३ हिंदी काव्यग्रंथही लिहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पन्हाळ्याला कारागृहात ठेवलेले नव्हते. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी पन्हाळ्याहूनच कारभार चालवला होता. त्यांना अटक करण्याचा डाव हंबीरराव मोहित्यांच्या बुद्धीमानतेने उघड झाला आणि अण्णाजी दत्तो, मोरोपंत पेशवे, बाळाजी आवजी इत्यादींना त्यांनी पदच्युत केले. नंतर त्यांची क्षमा मागून राज्यकारभारातील त्यांची पदे पुन्हा त्यांना दिली. त्यानंतर पुन्हा याच मंडळींनी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याची योजना केली. तेव्हा मात्र त्यांनी संबंधितांना देहांत शिक्षा दिल्या. सोयराबाई शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने मृत्यू पावल्या. बादशाहने शंभूराजांचे डोळे काढले, जीभ कापली. या अवस्थेत २४ दिवस त्यांचा अतोनात छळ झाला. शेवटी त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करून त्यांना ठार मारण्यात आले.

खोट्या शंभूचरित्राच्या प्रसारामागे त्यांचे गुण, विद्वत्ता, श्रमवृत्ती, धैर्य, हौतात्म्य सारे काही झाकले गेले आणि खोटारडा, दुष्ट, दोषैकबुद्धीने लिहिलेला चिटणीशी बखरीतील इतिहास दुर्दैवाने सत्य मानला गेला.

६. पृथ्वीराज चौहान यांचा शौर्यपूर्ण इतिहास दडपणे आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व उच्छृंखल असल्याचे दाखवणे

पृथ्वीराज चौहान यांच्या चरित्रातील जयचंद-कन्या संयोगितेवरील त्याचे प्रेम प्रकरण घोटून घोटून रंगवले गेले. महंमद घोरीचा त्याने गझनवी येथे घेतलेला प्रतिशोध झाकून टाकला गेला. घोरीच्या दर्ग्याच्या पायर्‍यांखाली प्रतिदिन अनेकांच्या पायांनी विटंबित होणार्‍या पृथ्वीराजाला न्याय देणारा पुरुष भारतीय राजसत्तेत ८०० वर्षांत निर्माणच होऊ शकला नाही. आज ते प्रकरणही लोकांच्या दृष्टीपासून दूर ठेवण्यात आले आहे. दाहर राजाच्या राजकन्यांनी वर्ष ७१२ मध्ये घेतलेल्या महंमद कासीमचा सूड आमच्या पुढच्या पिढ्यांना निश्चितच प्रेरक ठरेल; पण म्हणून की काय, आमच्या पुढच्या पिढ्यांना ते कळूसुद्धा नये, अशा प्रकारे विस्मृतीच्या गर्तेत त्यांचा पराक्रम दाबण्यात आला आहे.

७. गांधींनी क्रांतीकारकांचा इतिहास दडपून मुसलमानांचा अनुनय करणे

हे तर पुष्कळ जुने झाले; पण भारतीय स्वातंत्र्य समरांगणात जे क्रांतीवीर फासावर गेले, त्यांचा त्याग केवढा ! तोही आमच्या नव्या पिढीपुढे ठेवला जात नाही. सशस्त्र क्रांतीचा विचार हा जणू अपराध होता. मोहनदास गांधींना तो विचारच मान्य नव्हता. लंडनमध्ये भारत भवनातील सावरकरप्रणीत तरुणांना पाहून गांधी विस्मयचकित झाले. त्यांनी त्याला ‘मारो काटो का पंथ’ म्हटले. ‘भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांची फाशी रहित व्हावी, यासाठी ‘गांधींनी आयर्विन साहेबाकडे शब्द टाकावा’, ही मागणी ‘केवळ ते हिंसक मार्गाचे आहेत’; म्हणून गांधींनी स्वीकारली नाही. तेच गांधी स्वामी श्रद्धानंद यांचा खून करणार्‍या अब्दुल रशीदला ‘भाई अब्दुल रशीद’ म्हणतात, यातच त्याचे सारे रहस्य स्पष्ट होते. गांधींनी मुसलमान अनुनयाची लावलेली सवय आजही भारतीय राजकारणाला भारताचे तुकडे होऊनही ग्रासून राहिली आहे.’

(क्रमशः)

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

भाग ५४. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/836897.html