देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतीकारकांच्या बलीदानाचामोठा वाटा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील ‘क्रांतीवीर चापेकर स्मारका’चे लोकार्पण !

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – हुतात्म्यांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधू अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खर्‍या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. त्यांच्या बलीदानातून देशात क्रांतीकारकांची मोठी फळी उभी राहिली. दुर्दैवाने आपल्याला आज बोटावर मोजण्याइतकेच क्रांतीकारक परिचित आहेत, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतीकारकांच्या बलीदानाचा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून अपरिचित अशा साडेबारा सहस्र क्रांतीकारकांची गाथा देशासमोर येत असल्याचेही ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि ‘क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती’च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘क्रांतीवीर चापेकर स्मारका’चे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. चापेकर वाडा येथील राष्ट्रीय संग्रहालय आणि ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ला मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. त्यानंतर प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री म्हणाले की,

देवेंद्र फडणवीस

क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवा. त्यासाठी चापेकर स्मारकाला विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या, तर त्यांच्यावर संस्कार होतील. त्यानंतर ‘समरसता गुरुकुलम संस्थे’सही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे आमदार महेश लांडगे, ‘क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती’चे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे नाईक, हुतात्मा राजगुरु यांचे वंशज सत्यशील राजगुरु यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध, ही जनजागृतीची ठिणगी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

चापेकर बंधूंचे स्मारक हे अप्रतिम आणि प्रेरणा देणारे आहे. चापेकर बंधूंनी केलेला रॅंडचा वध, ही जनजागृतीची ठिणगी आणि देशाभिमानाचा हुंकार होता. अशा स्वातंत्र्यवीरांचा त्याग, बलीदान आणि समर्पण यांतूनच देश घडला आहे. त्यातूनच देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम आहे.

उपस्थिती
क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या तेजस्वी अध्यायांपैकी एक आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चापेकर स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असणारी चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली. शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. त्यांच्या स्मृतीस समर्पित हे राष्ट्रीय संग्रहालय केवळ एक स्मारक नाही, तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारा केंद्र आहे.

संपादकीय भूमिका

क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्यासच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, हे निश्चित !