Pandit Dhirendrakrishna Shastri : तुम्‍ही तुमच्‍या रक्षणासाठी काय सिद्धता केली आहे ?

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांचा भारतातील हिंदूंना प्रश्‍न !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री

नवी देहली – बांगलादेशातील हिंदूंची घरे जाळली गेली. ते पाहून ‘भारतातील हिंदूंनी काही सिद्धता केली आहे का ? नाहीतर तुम्‍हीही अशाच प्रकारे जाळले जाल’, अशी चेतावणी मध्‍यप्रदेशातील छतरपूर येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी हिंदूंना दिली आहे. ते पत्रकार सुशांत सिन्‍हा यांच्‍या ‘पॉडकास्‍ट’ला दिलेल्‍या मुलाखतीत बोलत होते. पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री येत्‍या नोव्‍हेंबरमध्‍ये बागेश्‍वर धाम ते ओरछा (मध्‍यप्रदेश) अशी १६० किलोमीटरची ‘हिंदू जोडो यात्रा’ करणार आहेत.

पत्रकार सुशांत सिन्‍हा यांनी ‘बांगलादेशात हिंदूंवर जे काही चालले आहे, त्‍याचा हिंदूंना काहीही फरक पडत नाही का ?’, असे विचारले असता धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री उत्तर देतांना म्‍हणाले,

१. आपल्‍यासमोर आपल्‍या बहिणी आणि मुली यांना कुणी पळवून नेले, तर आम्‍हाला कसे वाटेल ?

२. जरा विचार करा. ज्‍या देशात तुम्‍ही वर्षानुवर्षे राहून व्‍यवसाय केला आणि एक एक पैसा वाचवून घर, दुकान बांधले आणि २० लोक येऊन तुम्‍हाला लुटतात, मग तुम्‍ही मला खरे सांगाल का की, तुम्‍हाला कसे वाटेल ?

३. तुझीच मुलगी, जिला तू फुलासारखे वाढवले, एक अतिशय नाजूक मुलगी जिच्‍यावर एक दिवस एक क्रूर राक्षस वासनेपोटी क्रूरपणे बलात्‍कार करतो, खर सांग मित्रा, तुला कसे वाटेल ?

४. देवीच्‍या मंदिरात जाऊन तुम्‍ही पूजा करता. त्‍या देवीची मूर्ती तोडून कुणी फेकून दिली, तर मला सांगा, ते पाहून तुम्‍हाला कसे वाटेल?

५. ज्‍या देशात तुम्‍ही रहाता, त्‍याच देशात तुम्‍ही अल्‍पसंख्‍य होऊन तुम्‍हाला देश सोडण्‍याची धमकी ऐकावी लागेल. ज्‍यांच्‍या पूर्वजांनी बांगलादेशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी बलीदान दिले आणि देशासोबत उभे राहिले, त्‍यांना ‘देश सोडा, बांगलादेश सोडा’ असे सांगितले गेले, तर त्‍यांना किती वाईट वाटेल?

६. ज्‍या देशात तुमच्‍या पूर्वजांची आठवण आहे, ज्‍या देशात तुमचे घर आहे, त्‍या घराचे अंगण, तेथे असलेले चिंचेचे, आंब्‍याचे, लिंबाचे झाड सोडून जातांना तुम्‍हाला कसे वाटेल ?

७. तुमचे घर जाळून तुमच्‍या स्‍वप्‍नांची राख केली जाईल, खरच सांगा तुम्‍हाला त्‍या वेळी कसे वाटेल?’

८. पण भारताचे दुर्दैव आहे की, भारतातील हिंदू असे विचार करू शकत नाहीत आणि जागे होत नाहीत. एक दिवस असा येईल की, ते आपल्‍याला संपवून टाकतील. कोणत्‍या तरी षड्‌यंत्रात आपल्‍याला अडकवतील; पण या देशाचे दुर्दैव आहे की, हिंदूंना किती वेळा हाक दिली, तरीही ते घराबाहेर पडत नाहीत. तुम्‍हाला तुमचे मन आणि मुले एक दिवस नक्‍कीच विचारतील की, देशासाठी तुम्‍ही काय केले ? बांगलादेशामधील हिंदूंच्‍या घरात आग लागली आहे, ते भारतातील हिंदूंना विचारत आहेत की, तुम्‍ही अशा घटनांना सामोरे जाण्‍याची सिद्धता केली आहे का ?

संपादकीय भूमिका

भारतात गेली ७५ वर्षे हिंदू मारच खात आले असल्‍याने आणि सर्वपक्षीय सरकारे हिंदूंच्‍या रक्षणासाठी काही करत नसल्‍याने हिंदूंनाही बांगलादेशासारख्‍या स्‍थितीला पुढे सामोरे जावे लागेल. असे झाले, तर बांगलादेशात जे हिंदूंच्‍या संदर्भात झाले त्‍याचीच पुनरावृत्ती होणार, हीच वस्‍तूस्‍थिती आहे !