कुडाळ येथे महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !

  • वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात महसूल विभागाची कारवाई

  • दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद

  • चिपी (वेंगुर्ला) येथे ८ डंपरवर कारवाई

(डंपर म्हणजे मालाची वाहतूक करणारे वाहन)

सिंधुदुर्ग – महसूल विभागाने वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. या वेळी वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथे लपवून ठेवलेल्या वाळूच्या ८ डंपरवर कारवाई करण्यात आली, तर कुडाळ येथे वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात २ डंपरचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वेंगुर्ला तालुका महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृत वाळू वाहतुकीच्या विरोधात कारवाई करून तालुक्यातील चिपी येथील माळरानावर लपवून ठेवलेले अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ८ डंपर कह्यात घेतले. १७ जानेवारीला ही कारवाई करण्यात आली. सर्व कायदेशीर सोपस्कार करून या डंपरच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मागील महिन्यात अशाप्रकारे एकूण ८ डंपरवर कारवाई करण्यात आली होती. वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे.

कुडाळ तालुका महसूल विभागाच्या पथकाकडून गुढीपूर, पिंगुळी येथे अवैधरित्या वाळूची  वाहतूक करणारे ४ डंपर पकडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असतांना २ डंपरचालकांनी कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि त्यांच्या समवेत असलेल्या कर्मचारी यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १८ जानेवारी या दिवशी पहाटे घडली. दोन्ही डंपरचालक अंधाराचा लाभ घेत पसार झाले. या प्रकरणी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उर्वरित २ डंपर  कारवाईसाठी महसूल पथकाने तहसील कार्यालय आवारात आणले आहेत.

कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कारवाईसाठी नियुक्त केले आहे. हे पथक वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई करत असल्याने रागाने डंपरचालकांनी आक्रमण केल्याचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी सांगितले.

एका डंपरचालकाला पोलीस कोठडी : २ डंपर पोलिसांच्या कह्यात

कुडाळ – या प्रकरणातील महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालून नंतर डंपरसह पसार झालेल्या २ डंपर चालकांपैकी नदीम अब्दुल रेहमान शेख (केळबाईवाडी, कुडाळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला येथील न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरा संशयित मनिष दिगंबर पावसकर अद्याप पसार आहे. पावशी येथे झाडीत लपवून ठेवलेले २ डंपर पोलिसांनी कह्यात घेतले आहेत.