जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानद्वारे १४ दिवसांत १ लाखांहून अधिक बाटल्या रक्ताचे संकलन

रत्नागिरी – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी महाराष्ट्रात रक्तदानाची चळवळ चालू केली. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि श्रीस्वरूप संप्रदाय यांच्या वतीने केवळ १४ दिवसांत एक लाखांहून अधिक बाटल्या रक्त संकलन होणे कौतुकास्पद आहे आणि हा एक विक्रमच आहे, असे गौरवोद्गार दै. ‘रत्नागिरी टाइम्स’च्या संचालिका सौ. उर्मिला घोसाळकर यांनी काढले.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि श्रीस्वरूप संप्रदायाच्या वतीने ४ ते १९ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि येथील पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सौ. घोसाळकर बोलत होत्या. पटवर्धन हायस्कूल वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील, स्वरूप संप्रदायाचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, महिला तालुकाध्यक्ष अनिता जाधव, प्रसाद मोरे, अरुण जाधव या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अधिवक्ता नेत्रा समीर कामत यांनी केले. या वेळी रक्तदात्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.