भारतीय नौसेनेच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वृद्धी करणार्‍या युद्धनौका !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी या दिवशी माझगाव डॉक, मुंबई येथे ‘आय.एन्.एस्. सुरत’ आणि ‘आय.एन्.एस्. नीलगिरी’ या २ नव्या युद्धनौका अन् ‘आय.एन्.एस्. वाघशीर’ ही एक पाणबुडी यांचे लोकार्पण केले. या युद्धनौकांनी भारतीय नौसेनेच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वृद्धी केलेली आहे.

१. ‘आय.एन्.एस्. सुरत’ (गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर – मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक)

भारतीय नौसेनेच्या ‘प्रोजेक्ट-१५ बी’मधील ही चौथी अत्याधुनिक ‘डिस्ट्रॉयर’ आहे. ‘विशाखापट्टणम्’ वर्गवारीतील युद्धनौका ७५ टक्के भारतीय बनावटीची असून ती अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रगत संपर्क प्रणाली वापरण्यास सक्षम आहे. या वर्गवारीच्या युद्धनौका शत्रूला चटकन न सापडणार्‍या, स्वयंचलित आणि सुधारित शस्त्रास्त्रेयुक्त बनवलेल्या आहेत. या वर्गवारीत ‘आय.एन्.एस्. विशाखापट्टणम्’, ‘आय.एन्.एस्. मार्मागोवा’ आणि ‘आय.एन्.एस्. इंफाळ’, अशा इतर युद्धनौका आहेत.

२. ‘आय.एन्.एस्. नीलगिरी’ (स्टेल्थ गायडेड मिसाईल फ्रिगेट – शत्रूला चटकन न सापडणारी मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका)

भारतीय नौसेनेच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ने डिझाईन केलेली, ‘प्रॉजेक्ट-१७ ए’मधील ही प्रथम अत्याधुनिक ‘स्टेल्थ गायडेड मिसाईल फ्रिगेट’ (नीलगिरी वर्गवारी) आहे. ही पुढील पिढीची युद्धनौका ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ आणि ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स’ यांनी भारतीय नौसेनेसाठी सिद्ध केलेली आहे. या युद्धनौकेत ‘प्रगत पद्धतीने तग धरण्याची क्षमता, अधिक काळ सागरावर तरंगण्याची आणि शत्रूला चटकन न सापडण्याची क्षमता आणि नव्या पिढीची आत्मनिर्भर ‘फ्रिगेट’, अशी आधुनिक तंत्रे आहेत. भारतीय नौसेनेतील सध्याच्या ‘शिवालिक’ वर्गवारीतील ‘फ्रिगेट्स’च्या तुलनेमध्ये या फ्रिगेटमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केलेल्या आहेत. त्यामध्ये ‘शत्रूच्या रडारवर दिसण्यास कठीण आणि शत्रूला ‘इन्फ्रारेड’ किरणांच्या साहाय्याने शोधण्यासही कठीण’, अशा महत्त्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत. ‘नीलगिरी’ वर्गवारीच्या अशा एकूण ७ ‘फ्रिगेट्स’ ‘प्रॉजेक्ट-१७ बी’मध्ये सिद्ध करून त्या भारतीय नौसेनेच्या पूर्व आरमारामधील ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या विमानवाहू जहाजाच्या ताफ्यात (‘कॅरियर बॅटल ग्रुप’मध्ये) वर्ष २०२७ पर्यंत तैनात करण्यात येणार आहेत.

३. वैशिष्ट्ये

३ अ. शत्रूला चटकन न सापडण्याची क्षमता : हे वैशिष्ट्य साधण्यासाठी ‘मिश्रित साहित्य, रडार किरणे उत्सर्जित न करणारे थर आणि शत्रूच्या रडार किरणांना न दिसू शकणारी’, या तंत्रज्ञानांचा वापर केलेला आहे. अशा तंत्रज्ञानाच्या वापरामुळे युद्धनौका शत्रूला चटकन सापडत नाही.

३ आ. युद्धनौकेच्या रचनेतील वैशिष्ट्ये : युद्धनौकेच्या रचनेत ‘जहाज बांधण्याची बंद-जागा, शत्रूला न दिसणारी अशी शस्त्रास्त्र प्रणाली आणि कमी संख्येने अँटेना’, ही वैशिष्ट्ये असल्याने तिची क्षमता वाढते.

३ इ. जहाजाची इन्फ्रारेड किरणांची स्वाक्षरी (infrared signature) : युद्धनौकेची इन्फ्रारेड किरणांची स्वाक्षरी न्यून करण्यासाठी ‘व्हेंचुरी प्रभाव आणि द्रवाने एक्झॉस्ट’ तापमान घट करून इंजिन अन् शक्ती निर्मितीच्या उत्सर्गात घट करण्यात आली. यामुळे युद्धनौकेची ‘स्टेल्थ’ क्षमता वाढतात.

३ ई. आवाजावर नियंत्रण : जहाजाला पाण्यातून पुढे नेणार्‍या पंखांचे डिझाईन पालटून पंखांच्या फिरण्याने पोकळी निर्माण होऊन होणारा आवाज नियंत्रित करण्यात आला आहे, तसेच जहाजाच्या सांगड्याचे डिझाईन पालटून आणि आवाज करणार्‍या यंत्रांवर आवरणे घालून, बाहेर पडणारा आवाज नियंत्रित करण्यात आला आहे.

४. ‘आय.एन्.एस्. वाघशीर (‘स्कॉर्पिन क्लास’ पाणबुडी) 

भारतीय नौसेनेच्या ‘प्रोजेक्ट-७५’च्या अंतर्गत फ्रान्सच्या ‘नेव्हल ग्रुप’च्या सहकार्याने निर्माण केलेली २ सहस्र टन वजनाची ही ६ वी स्कॉर्पिन क्लास पाणबुडी आहे. पाणबुडी-निर्मिती क्षेत्रामध्ये भारतीय नेव्हल ग्रुपने नैपुण्य मिळवले. वर्ष २००५ मध्ये भारताच्या माझगाव डॉकशिप, मुंबई येथे चालू झालेले ६ ‘काल्वरी क्लास’ पाणबुड्या निर्माण करण्याचे प्रकल्प  ‘आय.एन्.एस्. वाघशीर’च्या लोकार्पणाने पार पडत आहे. आता या पाणबुडीच्या सागरी, शस्त्रास्त्रे आणि ‘सेन्सर्स’ यांच्या चाचण्या चालू होतील. पाणबुड्या निर्मितीचे हे प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. फ्रान्सच्या ‘नेव्हल ग्रुप’कडून माझगाव डॉकशिप बिल्डर्स यांच्याकडे तंत्रज्ञान हस्तांतरित होतांना ५० भारतीय खासगी कंपन्यांनी पाणबुड्यांचे अनेक भाग निर्माण करून स्वतःची अत्याधुनिक तांत्रिक व्यावसायिक निर्मितीची क्षमता दर्शवली आहे.

४ अ. सागराच्या तळाशी विविध क्षेत्रांमध्ये कार्य करण्याची क्षमता : शत्रूच्या पाणबुड्यांच्या विरुद्ध आक्रमण, दूर अंतरावर जाऊन सागरी आक्रमणे करणे, शत्रूच्या प्रदेशांत जाऊन गुप्त हेरगिरी करणे इत्यादी. शत्रूच्या ‘रडार सिस्टीम’वर न दिसणार्‍या आणि अतीवेगाने सागराच्या पोटातून प्रवास करणार्‍या या पाणबुडीला स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अत्यल्प नाविक चालवू शकतात. त्यामुळे तिचा वापरण्याविषयीचा व्यय फारच न्यून आहे. शस्त्रास्त्र क्षमतेमध्ये ही पाणबुडी तिच्या ६ ‘लाँचिंग ट्यूब्ज’मधून सागरी शत्रूंवर १८ ‘टॉरपीडोज’ किंवा हवेतील शत्रूंवर मार्गदर्शित क्षेपणास्त्रे डागू शकते.

५. भारतीय ‘नेव्हल ग्रुप’

वर्ष २००८ मध्ये फ्रान्सच्या ‘नेव्हल ग्रुप’च्या सहकार्याने भारतीय ‘नेव्हल ग्रुप’ची स्थापना करण्यात आली. आत्मनिर्भरता निर्माण करून भारतातील विविध क्षेत्रांमध्ये औद्योगिक आणि नाविक निर्मिती करणे, हे भारतीय नेव्हल ग्रुपचे प्रमुख कार्य आहे. ते साध्य करतांना त्यांनी कित्येक भारतीय अभियंते आणि तांत्रिक सिद्ध केलेले आहेत. स्वतःची संरक्षण क्षमता वर्धित करून, तसेच निर्यात क्षमताही निर्माण केलेली आहे.

६. भारताची नाविक रणनीती संधी

एका दिवशी ३ युद्धनौका लोकार्पण करणारे भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे. सहस्रो किलोमीटर्स लांबीचा सागरी किनारा ही भारताची फार मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तिन्ही सागरांची भारतावर असीम कृपा आहे. अशा सुदूर सागरी प्रदेशावर स्वतःचे प्रभुत्व संपादन करण्यासाठी भारताच्या या ३ युद्धनौका स्वतःचे योगदान देणार आहेतच. आत्मनिर्भरतेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नौसैनिक क्षमतेमध्ये भारताने केलेली ही वृद्धी नेत्रदीपक आहे. भारताची नाविक रणनीती संधी अशीच चालू रहावी. त्यामुळे या तिन्ही सागरांवर भारताचे प्रभुत्व स्थापित होणे शक्य होणार आहे. या संधीमागे निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा कारणीभूत असून याचे श्रेय त्यांना देणे आवश्यक आहे. समुद्रांवर चाचेगिरी करणारे अनेक देश भारतीय नौसेनेला दबून असतातच. यापुढे अशी सामुद्रिक चाचेगिरी करतांना त्यांना निश्चितच पुनर्विचार करावा लागेल. (१६.१.२०२५)

– विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त), पुणे.