विक्रीसाठी आणलेले गायीचे खोंड अपघातात घायाळ झाल्यावर गोरक्षकांकडून खोंडावर उपचार आणि शेतकर्‍यास अर्थसाहाय्य !

घायाळ झालेले खोंड आणि त्याची वाहतूक करतांना गोरक्षक

सांगली, १९ जानेवारी (वार्ता.) – खरसुंडी येथील जनावरांच्या बाजारात कवठेमहांकाळ येथील शेतकरी वसंत मंडले हे त्यांचे खिल्लार जातीचे खोंड विक्रीसाठी घेऊन आले होते. दुर्दैवाने बाजारात झालेल्या अपघातात त्या खोंडाचे पुढचे दोन्ही पाय निकामी झाले. ३० सहस्र रुपये मूल्य असलेले हे खोंड अन्य कुणी खरेदी करत नाही, हे पाहून त्याला कसाई ५ सहस्र रुपयांना त्या शेतकर्‍याकडे मागू लागले. ही गोष्ट ‘बजरंग दल पलूस तालुका प्रखंड’चे भिलवडी येथील गोरक्षक ऋषिकेश थोरात, राहुल माने, विशाल शेनोले, प्रमोद शेनोले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शेतकर्‍याचे प्रबोधन करून ते खोंड गोशाळेत पाठवण्यास प्रवृत्त केले. याचसमवेत सांगली येथील ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघ सांगली जिल्हा’ यांच्या पुढाकाराने या शेतकर्‍यास ५ सहस्र रुपयांचे साहाय्य करण्यात आले.

‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे श्री. अंकुश गोडसे यांनी तात्काळ या खोंडावर उपचार केले, तसेच पुढील उपचार आणि संगोपनासाठी कराड येथील ‘श्री भगवान महावीर गोपालन सेवा संस्था कराड’ संचलित ‘ध्यान फाउंडेशन गोशाळा घोलपवाडी’ यांच्याकडे देण्यात आले. या कामात गोशाळेचे व्यवस्थापक वैभव जाधव यांनी चांगल्या प्रकारे साहाय्य केले. या शेतकर्‍यास आर्थिक साहाय्य देण्यात सर्वश्री मिलिंद एकबोटे, अमित पाटील, सिद्धार्थ पेंडुरकर, महेश सुतार, सुनील उपाध्ये, अमोल शिंदे, पोपट जाधव या गोप्रेमींचा सहभाग होता. कसायांपासून गोवंश वाचवणे, त्यांचे संरक्षण-संगोपन या कार्यात ज्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी श्री. अंकुश गोडसे – ७२७६९७७११ या क्रमांकावर थेट आर्थिक साहाय्य पाठवावे, असे आवाहन श्री. गोडसे यांनी केले आहे.