विजयदुर्ग समुद्रात प्रकाशझोतात मासेमारी करणार्‍या नौकेवर कारवाई

नौकेसह अनुमाने १० लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त

देवगड – तालुक्यातील विजयदुर्ग येथील समुद्रात प्रकाशझोताचा (एल्.ई.डी. लाईटचा) वापर करून मासेमारी करणार्‍या एका नौकेवर कारवाई करण्यात आली. या वेळी नौका आणि मासेमारीचे साहित्य, असा एकूण ८ ते १० लाख रुपयांचा मुद्देमाल मत्स्यविभागाच्या पथकाने कह्यात घेतला. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचे रक्षण आणि अवैध मासेमारीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ‘ड्रोन’ व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित
करण्यात आली आहे. यानंतर कोकण किनारपट्टीवर अवैधरित्या मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे ‘मुक्ताई’ नावाची मासेमारी नौका येथे प्रकाशझोतात मासेमारी करत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने कारवाई करून नौका आणि त्यातील ८ ते १० लाख रुपये किंमतीचे प्रकाशझोतासाठी वापरले जाणारे साहित्य कह्यात घेतले. ही नौका विजयदुर्ग बंदरात ठेवण्यात आली आहे.