कवळे येथील पुरोहित ब्राह्मण आणि द्रविड ब्राह्मण संघांच्या संयुक्त संमेलनात करवीर पीठाधीश्वर प.पू. विद्यानृसिंह भारती सरस्वती स्वामी यांचे आशीर्वचन !
कवळे : सकाळी उठल्यापासून भगवंताच्या स्मरणाने सर्व व्यवहार जाणीवपूर्वक धर्माचरणासह करणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे परमकर्तव्य आहे, असे मार्गदर्शन करवीर पीठाधीश्वर प.पू. विद्यानृसिंह भारती सरस्वती स्वामी यांनी येथे केले. श्री संस्थान गौडपादाचार्य मठ, कवळे येथे १९ जानेवारीला पुरोहित ब्राह्मण संघ आणि द्रविड ब्राह्मण संघ यांच्या वतीने संयुक्तरित्या संमेलन पार पडले. या संमेलनात ते मार्गदर्शन करत होते. सकाळी ९.४५ वाजता संमेलनाला प्रारंभ झाला. व्यासपिठावर जगद्गुरु करवीर पीठाधीश्वर प.पू. विद्यानृसिंह भारती सरस्वती स्वामीजी, पंडितप्रवर शांताराम भानोसे गुरुजी, संमेलनाध्यक्ष श्री. दिलीप ढवळीकर, पंचद्रविड पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश कथने, ज्येष्ठ पुरोहित वेदमूर्ती नारायण बोरकर, पुरोहित ब्राह्मण संघाचे अध्यक्ष वेदमूर्ती संदीप टेंग्से आणि पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष वेदमूर्ती राजू केळकर हे उपस्थित होते.
नामजपाच्या गजरात स्वामीजींचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. प्रथम वैदिक मंगलाचरण, त्यानंतर दीपप्रज्वलन, स्वागत, प्रास्ताविक आणि गुरुपादुका पूजन यांच्याद्वारे संमेलनाचा शुभारंभ झाला. वेदमूर्ती संदीप टेंग्से यांनी प्रास्ताविक भाषणात संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. संमेलनाध्यक्ष श्री. दिलीप ढवळीकर यांनी संमेलनाविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि भविष्यातील कार्यांसाठी सहकार्याचे आवाहन केले.

श्री श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांचे आशीर्वचन
स्वामीजींनी पुरोहित ब्राह्मण संघ आणि द्रविड ब्राह्मण संघ यांच्या एकत्रीकरणाचे स्वागत केले आणि सर्व ब्राह्मण बांधवांना एकत्र येऊन प्रगतीपथावर जाण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धेच्या युगात ब्राह्मण समाजाने एकजुटीने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. ब्राह्मण कुळात जन्म घेणे, हे भाग्याचे लक्षण आहे; परंतु त्यासमवेतच दायित्वही येते. परमेश्वराने ब्राह्मणांना दिलेल्या बुद्धीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ब्राह्मणांनी भगवंताला प्रसन्न करता येईल, असे सदाचारी वर्तन ठेवले पाहिजे. त्याविना भगवंतप्राप्ती होत नाही. पुरोहित ब्राह्मण पूजा, पौरोहित्य आणि अनुष्ठानांच्या माध्यमातून समाजाची सेवा करतात. त्याचा लाभ समाजाला होतो. याचा पुरोहित ब्राह्मणांना आध्यात्मिक लाभ होण्यासाठी त्यांनी सेवाभाव, धर्माचरण आणि सदाचार यांचे कटाक्षाने पालन करावे.’’
पुरोहित संमेलनातील महत्त्वपूर्ण ठराव
१. गोवा ही परशुरामभूमी आहे. गोमंतकाचे निर्माते भगवान परशुरामांची जयंती सार्वजनिकरित्या शासकीय स्तरावर साजरी करावी.
२. ‘गोमंतक’ असा गायीच्या नावावरून जो गोवा प्रदेश ओळखला जातो, त्या गोवंशियांचे संवर्धन, रक्षण, पोषण आणि पालन उत्तमरितीने होण्यासाठी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात यावा.
३. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यात यावे.
४. मंदिराच्या परिसरात आध्यात्मिक पर्यटनाच्या अंतर्गत आवश्यक सोयीसुविधा (प्रसाधनगृह वाहनतळ यांसारख्या) उपलब्ध करून द्याव्या.
५. सर्व देवस्थानांमधील अर्चक, पुरोहित यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी गोव्यात अर्चक-पुरोहित संरक्षण कायदा करण्यात यावा.
६. पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात यावा.
७. मंदिराचे धन भाविकांनी धर्मासाठी अर्पण केलेले असल्याने धर्मप्रचाराच्या कार्यासाठी वापरले जावे. त्यासाठीची अनुमती देवस्थानांना देण्यात यावी.