
कोल्हापूर, १९ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याचा प्रारंभ असायला हवा. पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा असून त्याला सर्वांनी स्वीकारायला हवे, असे त्यांचे आदर्श चरित्र आहे. त्यामुळे हा विचार सर्व समाजात पोचवणे, तो पुढच्या पिढ्यांत रुजवणे या उद्देशाने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रभु श्रीराम यांची महिमा उलगडणारा पहिला मराठी चित्रपट ‘मिशन अयोध्या’ हा २४ जानेवारीपासून मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती प्रमुख भूमिकेतील अभिनेते नीलेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता शिंदे, डॉ. अभय कामत, सागर गुंजाळ, राहुल कुलकर्णी आणि प्रसिद्धी प्रमुख राम कोंडिलकर उपस्थित होते.
अभिनेते नीलेश देशपांडे म्हणाले, ‘‘मिशन अयोध्या’ हा एक चित्रपट नसून एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो प्रत्येक रामभक्ताला, देशवासियांना आपल्यासमवेत पुढे नेणारा आहे. हे मिशन प्रभु श्रीरामाच्या हृदयाशी प्रत्येकाला जोडणारा आहे तोडणारे नव्हे.
असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असतांना आपलेही एक पान इतिहासात असावे, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणार्या एका सामान्य शिक्षकाची असामान्य कथा आहे. अजित देशमुख हे इतिहास विषयाचे शिक्षक असून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्तासुद्धा आहेत. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित करायचे ठरवले आहे. ज्याचे नाव आहे ‘मिशन अयोध्या.’’
चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे म्हणाले, ‘‘भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकता यांचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभु श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. हा चित्रपट १०० पेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून तो प्रेक्षकांनी जरूर पहावा, असे आवाहन या निमित्ताने मी करत आहे.’’