PIL Against IC-814 Webseries : हिंदु सेनेची वेबसिरीजवर बंदी आणण्‍यासाठी देहली उच्‍च न्‍यायालयात याचिका !

‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ या ‘नेटफ्‍लिक्‍स’वरील वेबसिरीजच्‍या माध्‍यमातून हिंदूंच्‍या भावना दुखावल्‍याचे प्रकरण

(वेबसिरिज म्‍हणजे ऑनलाईन प्रसारित करण्‍यात येणारी व्‍हिडिओची मालिका)

मुंबई – ‘नेटफ्‍लिक्‍स’ या ओटीटी मंचावर नुकत्‍याच प्रसिद्ध झालेल्‍या ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ (कंदहार विमान अपहरण) या वेबसिरीजवर बंदी घालण्‍यासाठी एक जनहित याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली आहे.

या सिरीजमध्‍ये तथ्‍यांशी छेडछाड करण्‍यात आली असून विमान अपहरण करणार्‍या इस्‍लामी आतंकवाद्यांची नावे पालटण्‍यात आल्‍याचे ‘हिंदु सेना’ या संघटनेने प्रविष्‍ट केलेल्‍या या याचिकेत म्‍हटले आहे. या वेब सिरीजमुळे हिंदूंच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍याचेही याचिकेतून सांगण्‍यात आले आहे.

सेन्‍सॉर बोर्डाने या वेब सिरीजचे प्रमाणपत्र रहित करावे आणि तिच्‍या प्रसारणावर बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्‍यात आली आहे. (याचिकेतील ही तांत्रिक चूक आहे. ओटीटी मंच हे सेन्‍सॉर बोर्डाच्‍या अखत्‍यारीत येत नाही. केंद्र सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेच या सीरिजवर बंदी आणण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक) हिंदु सेनेचे सुरजीत सिंह यादव यांनी ही याचिका केली आहे.

काय आहे प्रकरण ?

२४ डिसेंबर १९९९ या दिवशी काठमांडूहून उड्डाण केल्‍यानंतर पाकिस्‍तानी आतंकवाद्यांनी ‘इंडियन एअरलाईन्‍स’च्‍या विमानाचे अपहरण केले होते. याचीच कथा या वेबसिरीजमध्‍ये दाखवण्‍यात आली आहे. विमानाचे अपहरण करणारे जिहादी आतंकवादी यांची नावे इब्राहिम अतहर (बहावलपूर), शाहिद अख्‍तर (कराची), सनी अहमद (कराची), जहूर मिस्‍त्री (कराची) आणि शाकीर (सुक्‍कुर सिटी) अशी होती; मात्र वेब सिरीजमध्‍ये २ आतंकवाद्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्‍यात आली आहेत. घटनेचा पूर्णपणे विपर्यास करणार्‍या या वेब सिरीजवर बहिष्‍कार घालण्‍याचीही मागणी करण्‍यात येत आहे. या माध्‍यमातून हिंदु धर्माचा अवमान होत आहे. अलीकडेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्‍लिक्‍सच्‍या ‘कंटेंट हेड’ला या मालिकेतील ओळख पालटण्‍यासंदर्भात समन्‍स बजावले होते.

दिग्‍दर्शक अनुभव सिन्‍हा यांनी ही वेब सिरीज बनवली आहे. ही वेबसिरीज नेटफ्‍लिक्‍सवर २९ ऑगस्‍ट या दिवशी प्रसारित करण्‍यात आली.