‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन !

‘जोडे मारा’ आंदोलन

मुंबई – राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आदी नेते सहभागी झाले होते. शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे नेते अन् कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.

हुतात्मा चौक येथे आंदोलकांनी ‘गेट वे ऑफ इंडिया’पर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी महािवकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोड्यांनी मारले. या वेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. या आंदोलनामुळे सकाळी १० वाजल्यापासून ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. या वेळी भाषण करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘चुकीला क्षमा नाही. शिवद्रोही राज्य सरकारला ‘गेट आऊट इंडिया’ करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले.’’

‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य आहेत. विरोधक मात्र राजकारण करत आहेत. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठीच विरोधक आंदोलन करत आहेत. आम्ही मात्र संयमी भूमिका कायम ठेवू.’’  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचे प्रत्युत्तर आंदोलन !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे महाविकास आघाडीकडून राजकारण करण्यात येत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी राज्यभरात विविध ठिकाणी प्रत्युत्तर आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये दादर (पूर्व) येथे रेल्वेस्थानकाच्या बाहेर प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली प्रत्युत्तर आंदोलन करण्यात आले.