Charkhi Dadri Lynching : दादरी (हरियाणा) येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून साबिर मलिक याचा मारहाणीत मृत्यू !

अटक करण्यात आलेल्या ७ जणांपैकी २ जण अल्पवयीन !

चंडीगड – हरियाणा राज्यातील चरखी दादरी जिल्ह्यात २७ ऑगस्टला झालेल्या एका घटनेत गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून साबिर मलिक नावाच्या एका स्थलांतरित व्यक्तीला काही जणांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये साबिरचा मृत्यू झाला. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी अभिषेक, मोहित, रविंदर, कमलजीत आणि साहिल अशी ५ जणांची नावे असून अन्य दोघे अल्पवयीन आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी ३१ ऑगस्ट या दिवशी प्रसारमाध्यमांना दिली.

१. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार साबीर याला २७ ऑगस्टला गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून ७ आरोपींनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या विकण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावले. तेथे त्याला अमानुष मारहाण करण्यात आली.

२. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, जेव्हा आरोपी त्याला मारहाण करत होते, तेव्हा काही लोकांनी हस्तक्षेप केला. यानंतर त्यांनी साबीरला दुसर्‍या ठिकाणी नेले आणि तेथे पुन्हा मारहाण केली. हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरले.

३. पोलिसांनी सांगितले की, मलिक चरखी दादरी जिल्ह्यातील वांद्रे गावाजवळ असलेल्या झोपडपट्टीत रहात होता. उदरनिर्वाहासाठी तो भंगार गोळा करण्याचे काम करत असे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोमातांवर लोकांच्या श्रद्धा असल्याने अशा घटना घडतात ! – मुख्यमंत्री सैनी

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी

या घटनेविषयी हरियाणातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कठोर कायदा केला आहे. यात कोणतीही तडजोड केली जात नाही. गायीवर लोकांची श्रद्धा आहे. त्यांच्या भावना गायींशी जोडल्या गेल्या आहेत. गोमांसाच्या संदर्भात अशा प्रकारची माहिती समोर आल्यावर गावातील लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात. जमावाकडून हत्या होण्यासारख्या घटना दुर्दैवी आहेत आणि त्या घडू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारे हत्या केली जाणे, हे दुर्दैवी आहेच ! हरियाणात विधानसभेच्या निवडणुका पहाता अशा घटना राजकीय हेतूने प्रेरित असल्याची शक्यताही नाकारता येणार नाही. असे असले, तरी मुळात हिंदूंच्या धार्मिक भावना सहस्रावधी वेळा तुडवल्या गेल्या आणि त्या विरुद्ध कुणी काहीच केले नाही. याचे पर्यावसान अशा घटनेत झाले, असे कुणी म्हटल्यास त्याला काय उत्तर देणार ?
  • वर्ष २०१५ मध्ये दादरीतच अकलाखची गोमांस ठेवल्याच्या कारणाने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात असहिष्णुता वाढल्याची बांग ठोकण्यात आली. आताही तसे षड्यंत्र रचून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको !