राजकोट किल्‍ल्‍यावर ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्‍याने वातावरण तणावग्रस्‍त

  • राजकोट (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्‍याचे प्रकरण

  • नारायण राणे आणि नीलेश राणे यांची पोलिसांशी शाब्‍द़िक चकमक

  • महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना पोलीस बंदोबस्‍तात बाहेर काढले

  • दोन्‍ही गटांकडून दगडफेक

मालवण – शहरातील राजकोट किल्‍ल्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍यानंतर त्‍यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्‍या महाविकास आघाडीने मालवण बंद घोषित केला होता. त्‍यानिमित्ताने येथे आलेल्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी राजकोट किल्‍ल्‍याला भेट देऊन तेथील स्‍थितीचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे नेते खासदार नारायण राणे हेही कार्यकर्त्‍यांसह तेथे पोचले. त्‍या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्‍य ठाकरे आणि खासदार राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्‍याने घोषणाबाजी चालू होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. यातूनच दोन्‍ही गटांच्‍या कार्यकर्त्‍यांनी एकमेकावर दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्‍तक्षेप केल्‍यानंतर स्‍थिती निवळली. त्‍यानंतर महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना पोलिसांच्‍या गराड्यात किल्‍ल्‍याबाहेर काढण्‍यात आले आहे.

दोन्‍ही गट समोर आल्‍याने परिस्‍थिती चिघळली !

महाविकास आघाडीने या प्रकरणी मालवण बंदची हाक दिली होती. त्‍यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्‍य ठाकरे, राष्‍ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक  यांच्‍यासह महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी राजकोट किल्‍ल्‍याला भेट देऊन स्‍थितीचा आढावा घेतला. या वेळी  तिन्‍ही पक्षांचे नेते घटनास्‍थळाची पाहणी करत असतांना नारायण राणे, भाजपचे माजी खासदार नीलेश राणे त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांसह तेथे आले. या ठिकाणाची पहाणी करण्‍याची वेळ दोन्‍ही गटाची वेगवेगळी होती; मात्र दोन्‍ही गट एकाच वेळी आल्‍याने परिस्‍थिती चिघळली. यामुळे किल्‍ल्‍याच्‍या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला.

आदित्‍य ठाकरे यांचे ठिय्‍या आंदोलन !

नारायण राणे आणि नीतेश राणे यांचे कार्यकर्ते राजकोट किल्‍ल्‍याच्‍या प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत राहिल्‍याने महाविकास आघाडीचे सर्वच नेते किल्‍ल्‍यावर अडकून पडले. या घटनेनंतर आदित्‍य ठाकरे यांनी त्‍यांच्‍या सहकार्‍यांसह राजकोट किल्‍ल्‍यावरच ठिय्‍या आंदोलन केले. पुतळ्‍याची पहाणी केल्‍यानंतर या घटनेचा निषेध नोंदवण्‍यासाठी मालवणमध्‍ये मोर्चाही काढण्‍यात आला.

आदित्‍य ठाकरे म्‍हणाले, ‘‘आम्‍ही आतमध्‍ये येत असतांना प्रवेशद्वारावर मोठी गर्दी होती. तेथे धक्‍काबुक्‍की चालू झाली. भाजपमुळे महाराष्‍ट्राची अपकीर्ती होत आहे. पत्रकारांनाही धक्‍काबुक्‍की झाली. महाराजांच्‍या किल्‍ल्‍याच्‍या ठिकाणी राजकारण न करण्‍याची सूचना मी आमच्‍या कार्यकर्त्‍यांना केली. महायुती सरकारने या पुतळ्‍याचे दायित्‍व झटकले आहे. त्‍यांनी नौदलावर या घटनेचे खापर फोडले आहे.’’

जयंत पाटील यांचा मध्‍यस्‍थीचा प्रयत्न  

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांनी किल्‍ल्‍यावरील वाढता तणाव लक्षात घेऊन स्‍वतः पुढाकार घेऊन नारायण राणे आणि नीलेश राणे यांच्‍याशी संवाद साधला. ते थेट राणे समर्थकांच्‍या गर्दीत गेले. तेथे प्रथम नीलेश राणे आणि त्‍यानंतर नारायण राणे यांच्‍याशी संवाद साधून त्‍यांना वाद टाळण्‍याची विनंती केली; मात्र दोन्‍ही गट त्‍यांच्‍या म्‍हटण्‍यावर ठाम राहिल्‍याने तिढा निर्माण झाला. अंततः राणे यांनी मार्ग मोकळा करून दिल्‍यानंतर पोलीस बंदोबस्‍तात महाविकास आघाडीचे नेते किल्‍ल्‍यावरून बाहेर पडले. ‘ही जागा भांडण करण्‍याची नाही. पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. येथे झाले काय आणि आपण करतोय का ? याचा विचार केला पाहिजे’, असे पाटील यांनी सांगून मध्‍यस्‍थी करण्‍याचा प्रयत्न केला.