Himanta Biswa Sarma : मुसलमानांना आसाम कह्यात घेऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी २७ ऑगस्ट २०२४ या दिवशी विधानसभेत मुसलमान समुदायाविषयी बोलतांना ‘मियाँ मुसलमानांना आसाम कह्यात घेऊ देणार नाही’, असे विधान केले. ते विधानसभेत नागाव येथील एका १४ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेसंदर्भात बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

आसाम विधानसभेत विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेविषयी प्रश्‍न उपस्थित होता. या वेळी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, लोकसंख्येत झालेली वाढ जर नियंत्रणात ठेवली असती, तर आज गुन्हेगारीचे प्रमाण वाढले नसते.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही बाजूंचे आमदार विधानसभेच्या अध्यक्षांच्या आसनासमोर आल्यामुळे अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करावे लागले.