NCRB Report : भारतात प्रत्येक ३ घंट्यात एका महिलेवर बलात्कार होतो ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर !

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (‘एन्.सी.आर्.बी.’ने) घोषित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात प्रत्येक ३ घंट्यांत एका महिलावर बलात्कार होतो. वर्ष २०२२ मध्ये देशात बलात्काराच्या एकूण ३१ सहस्र ५१६ घटनांची नोंद झाली. यांत सर्वाधिक बलात्कार राजस्थान राज्यांत झाले. या ठिकाणी ५ सहस्र ३९९ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर उत्तरप्रदेशात ३ सहस्र ६९० बलात्काराची प्रकरणे समोर आली आहेत. तिसर्‍या क्रमांकावर मध्यप्रदेश असून तेथे ३ सहस्र २९ बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून तेथे बलात्काराचे २ सहस्र ९०४ गुन्हे नोंदवण्यात आले.

केवळ २७ टक्के आरोपींना शिक्षा मिळते !

भारतात बलात्काराच्या प्रकरणांतील १०० आरोपींपैकी केवळ २७ जणांना शिक्षा मिळते, म्हणजेच हे प्रमाण केवळ २७ टक्के आहे. वर्ष २०२२ मध्ये गुन्हा नोंद झालेल्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये केवळ १८ सहस्र प्रकरणांत सुनावणी पूर्ण झाली आहे, तर ५ सहस्र प्रकरणांत दोषींना शिक्षा झाली आहे. १२ सहस्रांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपींची सुटका करण्यात आली आहे. (हे भारतीय पोलीस आणि न्यायव्यवस्था यांना लज्जास्पद ! अशी स्थिती असेल, तर देशात बलात्काराच्या घटना कधीतरी थांबतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘भारत बलात्कार्‍यांचा देश झाला आहे’, अशी कुणी टीका करत असेल, तर त्याला कसे रोखणार ?
  • ही आकडेवारी देशाला लज्जास्पद आहे. यावर सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था विचार करत आहे का ? आणि त्यानुसार कृती करत आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !
  • आजपर्यंत बलात्कार्‍यांना कधीही कठोरात कठोर शिक्षा न झाल्यामुळे आणि ती होऊ नये, यासाठी समाजघातकी टोळी सतत प्रयत्नरत असल्याने बलात्काराच्या घटना पुनःपुन्हा घडतात !