न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेने भारताला ‘सोनोबॉय’ या उपकरणाची विक्री करण्यास स्वीकृती दिली आहे. ‘सोनोबॉय’ हे पाणबुडीविरोधी (एंटी सबमरीन) उपकरण आहे. यामुळे भारतीय नौदलाची शक्ती वाढणार आहे. यासाठी भारताला अनुमाने ५२.८ मिलियन डॉलरचा (४४३ कोटी रुपयांचा) खर्च येणार आहे. या उपकरणाच्या साहाय्याने भारतीय नौदलाला सहजतेने समुद्रात शत्रूच्या पाणबुड्या शोधून काढता येणार आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिकेच्या दौर्याच्या वेळी हा करार झाला. सिंह यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक सशक्त बनवण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी चर्चा केली. या वेळी संरक्षण सहकार्य, क्षेत्रीय सुरक्षा, औद्योगिक सहकार्य, भारत-प्रशांत क्षेत्र आणि अन्य महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा झाली.