Attacks on Hindus in Bangladesh : हिंदूंकडून खंडणीमध्‍ये मागितले जाते आहे सोने, पैसे आणि मुली !

बांगलादेशात अद्यापही हिंदूंवर आक्रमणे चालूच !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात(Bangladesh) अंतरिम सरकार स्‍थापन झाल्‍यानंतरही हिंदूंविरुद्ध (Hindu) हिंसाचार चालूच आहे. हिंदूंकडे खंडणीमध्‍ये सोने, पैसे, इतकेच नव्‍हे, तर मुलींना मागितले जात आहे. यामुळे पीडित हिंदू भारताकडे व्‍हिसाची मागणी करत आहेत, ते व्‍हिसा नसतांनाही सीमा ओलांडण्‍यास सिद्ध आहेत. या संदर्भात दैनिक ‘भास्‍कर’च्‍या प्रतिनिधींनी बांगलादेशात जाऊन माहिती घेतली असता अनेक घटना समोर आल्‍या.

१. एका हिंदूने सांगितले की, १५ ऑगस्‍ट या दिवशी १० ते १२ दुचाकीस्‍वार चाकू, हातोडा आणि विळा घेऊन त्‍याच्‍या घरी पोचले आणि जेव्‍हा त्‍यांना समजले की, तो घरी नाही, तेव्‍हा ते निघून गेले आणि दूरभाष करून धमक्‍या देऊ लागले. त्‍यामुळे या व्‍यक्‍तीला नातेवाईकाच्‍या ठिकाणी लपून रहावे लागले.

२. जसोर येथे एका आश्रमात मत्‍स्‍यपालन व्‍यवसायाशी संबंधित २ हिंदूंनी सांगितले की, त्‍यांच्‍याकडून २ – ३ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, अन्‍यथा ‘तुझ्‍या मुलाचे अपहरण करू’, अशी ते धमकी देत आहेत. ‘बांगलादेशात आम्‍हाला भविष्‍य नाही आणि आपली सर्व भूमी आणि मालमत्ता सोडून भारतात स्‍थायिक व्‍हायचे आहे’, असे त्‍यांनी सांगितले. तेथील त्‍यांचे कामही थांबले आहे.

३. मत्‍स्‍यपालन आस्‍थापनात काम करणार्‍या एका हिंदूने सांगितले की, आमच्‍या मालकाला धमक्‍या दिल्‍या जात आहेत. ‘मालकाकडून पैसे काढून घ्‍या, अन्‍यथा त्‍यांच्‍या गायी घेऊन जा’, असे आम्‍हाला सांगण्‍यात येत आहे. मालकाला धमकी देणारे लोक या आस्‍थापनात काम करणार्‍या हिंदूंच्‍या ओळखीचे आहेत. ते बांगलादेश नॅशनल पार्टीशी (बी.एन्.पी.शी) संबंधित आहेत. ते सोने, पैसे आणि मुली यांची मागणी करत आहेत. अनेक मुलींवर बलात्‍कार झालेले आहेत; पण त्‍यांची व्‍यथा त्‍या सांगू शकत नाहीत. आम्‍ही बी.एन्.पी.च्‍या लोकांना पैसेही दिले आहेत. नव्‍या सरकारवर आमचा अजिबात विश्‍वास नाही. आता बांगलादेशात हिंदूंना नोकर्‍या मिळू शकत नाहीत. सरकारी लोकच आम्‍हाला त्रास देत आहेत. सैन्‍य आणि पोलीस यांचा पत्ताच नाही. एका प्राथमिक शिक्षकावरही आक्रमण झाले आहे. त्‍यांना पळून जावे लागले. गावातील मंदिरांचे रक्षण करावे लागेल. पोलीस अधिकारीही पीडित हिंदूंना भेटायला सिद्ध नाहीत.

४. एका विद्यार्थ्‍याने सांगितले की, बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांच्‍या घरांवर चिन्‍हे लावण्‍यात आली आहेत आणि खंडणीची मागणी केली जात आहे. या विद्यार्थ्‍याचे पालक वृद्ध असून ते चितगाव येथे रहातात.

५. महाराष्‍ट्रातील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन ढाका येथे नोकरी करणार्‍या या हिंदु विद्यार्थ्‍याच्‍या कुटुंबाला बांगलादेश सोडण्‍यास सांगण्‍यात आले आहे. ५ लाख रुपयांची मागणी करणार्‍या व्‍यक्‍तीने दूरभाषवर स्‍वत:ची ओळख इस्‍लामी गटाचा सदस्‍य असल्‍याची करून दिली आहे. इतर हिंदूंनाही असे दूरभाष येत आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे थांबणार नाहीत; कारण ती वर्ष १९४७ पासूनच (पूर्व पाकिस्‍तानची स्‍थापना झाल्‍यापासूनच) चालू आहेत आणि हिंदू नष्‍ट होईपर्यंत ती चालूच रहाणार आहेत; कारण त्‍यांना इतक्‍या वर्षांत कुणीही वाचवण्‍यासाठी प्रयत्न केलेले नाहीत, आताही कुणी करत नाही आणि पुढेही कुणी करेल, असे नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे !