Jai Hind In Haryana Schools : विद्यार्थ्‍यांनी अभिवादन करतांना ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ म्‍हणावे !

हरियाणातील भाजप सरकारचे राज्‍यातील शाळांना निर्देश

चंडीगड – हरियाणा सरकारने राज्‍यातील शाळांमध्‍ये येत्‍या १५ ऑगस्‍टपासून ‘गुड मॉर्निंग’ असे बोलून अभिवादन करण्‍याचा इंग्रजी प्रघात बंद करण्‍याचे निर्देश दिले आहेत. याऐवजी विद्यार्थ्‍यांनी एकमेकांना किंवा शिक्षकांना अभिवादन करतांना ‘जय हिंद’ म्‍हणावे, असे या सरकारी पत्रकात नमूद करण्‍यात आले आहे. विद्यार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्रभक्‍ती आणि देशाभिमान जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने हा निर्णय घेण्‍यात आला आहे. त्‍यामुळे देशाच्‍या राष्‍ट्रीय ऐक्‍याविषयी आणि देशाच्‍या जाज्‍वल्‍य इतिहासाविषयी विद्यार्थ्‍यांमध्‍ये अभिमानाची भावना जोपासली जाईल, असे या पत्रकात म्‍हटले आहे.

१. या आदेशांचे पत्र सर्व जिल्‍हा शिक्षण अधिकारी, विभागीय शिक्षण अधिकारी, शाळांचे मुख्‍याध्‍यापक यांना पाठण्‍यात आले आहे; मात्र या आदेशांची सक्‍ती शाळांवर करण्‍यात आलेली नाही.

२. सरकारच्‍या पत्रकात म्‍हटले आहे की, अभिवादन करण्‍यासाठी ‘जय हिंद’ म्‍हणण्‍याचा प्रारंभ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केल्‍याचे मानले जाते. हीच पद्धत पुढे स्‍वातंत्र्यप्राप्‍तीनंतर भारतीय सैन्‍यानेही स्‍वीकारली.

३. ‘जय हिंद’ या शब्‍दांमधून प्रादेशिक, भाषिक आणि सांस्‍कृतिक सीमारेषा अस्‍पष्‍ट होऊन वेगवेगळ्‍या पार्श्‍वभूमीच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये एकतेचा विचार जोपासला जातो. यामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये शिस्‍तीबरोबरच एकात्‍मतेची भावना निर्माण होईल, असेही पत्रकात म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

असा निर्णय इतर राज्‍यांनी घेतला पाहिजे !