खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेले गोरक्षक जिग्नेश कंखरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी केला युक्तीवाद !

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठ

छत्रपती संभाजीनगर – चोपडा (जिल्हा जळगाव) येथील गोरक्षक जिग्नेश कंखरे, संग्रामसिंह परदेशी आणि अन्य यांच्याविरुद्ध गोतस्कर मुसलमानांकडूनच पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे सर्व गोरक्षक ७ मेपासून न्यायालयीन कोठडीत होते. याविषयी पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठासमोर युक्तीवाद केला. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून गोरक्षक जिग्नेश कंखरे यांना जामीन संमत केला आहे.

गोमातेची तस्करी करणार्‍या धर्मांध गोतस्करांविरुद्ध गोरक्षकांनी गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र धर्मांध गोतस्करांनीच ‘गोरक्षकांनी आमची पिकअप गाडी फोडली, आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला’, असा गोरक्षकांवरच गुन्हा नोंद करण्यास पोलिसांना भाग पाडले. जेव्हा गुन्हा घडला, तेव्हा गोतस्करांना चोपडा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना झालेल्या जखमा या साध्या असल्याचे प्रमाणपत्र तेथून देण्यात आले होते; मात्र त्यांनी खासगी डॉक्टरकडे जाऊन ‘त्या गंभीर जखमा आहेत आणि त्या डोक्यावर झाल्या आहेत’, असे खोटे प्रमाणपत्र मिळवून ते सादर केल्यामुळे गोरक्षकांविरुद्ध जिवे मारण्याचे कलम ३०७ लावण्यात आले. परिणामी त्यांना जामीन मिळण्यास अडथळा निर्माण झाला. (अशा खासगी डॉक्टरांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

याविषयी युक्तीवाद करतांना पू. अधिवक्ता कुलकर्णी आणि अधिवक्ता भडगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, पहिल्या दिवशी जखमा साध्या असतांना खासगी वैद्यकीय व्यावसायिक गंभीर जखमा (grievous injuries) असे प्रमाणपत्र कसे देऊ शकतो ? जिग्नेश कंखरे, संग्रामसिंह परदेशी आणि अन्य गोरक्षक यांनी यापूर्वी गोतस्करांवर अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. असे असतांना पोलिसांनी या वेळी त्यांना जाणीवपूर्वक खोट्या प्रकरणात गुंतवले आहे. जिग्नेश कंखरे घटनेच्या वेळी तेथे उपस्थित नव्हते, तर घरी होते. तरीही त्यांच्याविरुद्ध खोटा फौजदारी खटला प्रविष्ट करण्यात आला. यानंतर न्यायालयाने कंखरे यांना जामीन संमत केला.