संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन !

ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे

पुणे – संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे (वय ८६ वर्षे) यांचे २० जानेवारीला रात्री १०.३० वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आळंदी येथे २१ जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे २ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार चालू असतांनाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात मुलगी यमुना कंकाळ आणि २ मुले यशोधन साखरे आणि चिदम्बरेश्‍वर साखरे असा परिवार आहे. डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन ही वारकरी संप्रदायासाठी मोठी हानी आहे. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण आणि संत साहित्याचा वारसा सदैव प्रेरणादायी ठरेल. त्यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद होते. ते सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सर्व संप्रदाय सत्संगा’ला उपस्थित होते.

ज्ञानोबा-तुकारामांच्या नामस्मरणात पू. साखरे महाराजांना वारकरी संप्रदायाकडून शेवटचा निरोप !

आळंदी येथे २१ जानेवारीला दुपारी ४ वाजता गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्‍यांना शेवटचा निरोप देण्‍यासाठी सहस्रोंच्‍या संख्येने लोक जमले होते. ज्ञानोबा-तुकारामांच्या नामस्मरणात सहस्रो वारकरी भाविकांनी त्यांना आळंदी शहरात प्रदक्षिणेद्वारे मार्गक्रमण करत शेवटचा निरोप दिला.

जीवनप्रवास आणि आध्यात्मिक योगदान !

डॉ. किसन महाराज साखरे यांचा जन्म कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहुर्तावर वर्ष १९३८ मध्ये लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांच्या परिवाराला संत साहित्याचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील आणि आजोबा यांनी संत वाङ्मयाचा अभ्यास करून तो पुढे नेला. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील साधकाश्रमात गुरु-शिष्य परंपरेचा अंगीकार करून त्यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि व्याकरणशास्त्र यांचे सखोल अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन्.पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले. वर्ष १९६० मध्ये साधकाश्रमाचे दायित्व त्यांच्या हाती आले. तेव्हापासून त्यांनी निःस्वार्थपणे साधकाश्रमात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना संत साहित्य आणि तत्त्वज्ञान शिकवले. महाराष्ट्रभर कीर्तन आणि प्रवचन यांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्माचा प्रचार केला. त्यांनी शेकडो कीर्तनकार आणि प्रवचनकार घडवले, ज्यांनी समाजात आध्यात्मिक प्रबोधन घडवण्याचे कार्य पुढे चालू ठेवले.

वारकरी परंपरेचा आधारस्तंभ !

साखरे महाराजांनी आपल्या प्रवचनांमधून गीता, ज्ञानेश्‍वरी, भागवत आणि उपनिषद यांचे विचार ग्रामीण भागांतील लोकांपर्यंत पोचवले. त्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणालीसाठी विनामूल्य बाल संस्कार शिबिरे चालू केली. यामुळे सहस्रो विद्यार्थी चांगले नागरिक बनले. त्यांनी वारकरी परंपरेला समृद्ध करण्यासाठी आयुष्याचे शेवटचे क्षणही समर्पित केले.

साहित्य आणि सामाजिक कार्य

डॉ. साखरे महाराजांनी एकूण ११५ ग्रंथांची निर्मिती केली. सार्थ ज्ञानेश्‍वरी, सार्थ भगवद्गीता, सार्थ तुकाराम गाथा आणि सार्थ एकनाथी भागवत यांसारखे त्यांच्या लेखणीतून साकारलेले ग्रंथ वारकरी परंपरेचे अमूल्य योगदान ठरले आहेत. त्यांनी व्यसनमुक्तीचे मोठे सामाजिक कार्य केले आणि अन्नछत्र, ग्रंथालय अन् भक्तनिवास यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रीय योगदान दिले.

पुरस्कार आणि सन्मान

संत साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्याविषयी त्यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार (वर्ष २०१८) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापिठाकडून ‘डी.लिट्’ ही सर्वोच्च मानद पदवी मिळाली होती. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला नवा आध्यात्मिक दृष्टीकोन मिळाला.

ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे ‘ज्योतिर्लिंग पुरस्कारा’ने सन्मानित !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे प्रतिवर्षीप्रमाणे वर्ष २०२४ मध्ये ४ दिवसांचा महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी संस्थानाच्या वतीने त्यांना ‘ज्योतिर्लिंग पुरस्कार’ देण्यात आला होता.

सनातन संस्था आणि ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे

२४ फेब्रुवारी २००२ या दिवशी पुणे येथे झालेल्या ‘सर्व संप्रदाय सत्संगा’त ते मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. वर्ष २०११ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त त्यांनी संतसंदेश दिला होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांच्या संदर्भातील लिखाण !

संस्थापक, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वतःचा प्राणत्याग करून भक्ताला शिकवण्याची साखरे घराण्याची परंपरा !

‘एकदा किसन महाराज साखरे यांच्या वडिलांनी आपल्या शिष्याला कुंडलीतून लिंगदेह कसा बाहेर काढायचा आणि देहत्याग करायचा, हे परत परत सांगितले होते, तरीही त्या शिष्याच्या ते काही लक्षात येत नव्हते. तो परत परत त्याविषयी प्रश्‍न विचारत राहिला. एकदा सकाळी नदीच्या काठावर दोघे गेले असता परत त्यांनी आपल्या शिष्याला ‘कुंडलिनीतून लिंगदेह बाहेर काढून देहत्याग कसा करायचा’, हे सांगितले; पण तरीही त्या शिष्याच्या लक्षात आले नाही. तेव्हा त्या संतांनी त्याला विचारले, ‘‘तुला पहायचे आहे का कुंडलिनीतून लिंगदेह कसा बाहेर काढून प्राणत्याग करतात ते ?’’ शिष्य ‘हो’ म्हणाला. तेव्हा त्या संतांनी त्यांच्या खांद्यावरचे उपरणे त्या शिष्याला भूमीवर अंथरायला सांगितले आणि ते स्वतः त्यावर मांडी घालून बसले. थोड्याच वेळात त्यांनी कुंडलिनीतून लिंगदेह बाहेर काढून देहत्याग केला.’ (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले यांनी सुखसागर, फोंडा येथील आश्रमात घेतलेला सत्संग (१५.५.२००२)


दिनांक : १ मार्च २००३

प्रति,
परमपूजनीय श्री किसन महाराज साखरे यांना,
शिरसाष्टांग दंडवत

आपल्याला गंभीर अपघात झाल्याचे समजले. त्यानंतर गेल्या तीन आठवड्यांत आपल्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचे वेळोवेळी माहिती होतच आहे. ईश्‍वरकृपेने जिवावरील मोठे संकट टळले. आपल्या प्रकृतीमध्ये यापुढेही जलदगतीने सुधारणा होत रहावी आणि आपण आपले कार्य करण्यास पूर्वीप्रमाणेच सक्षम होऊन आपले बहुमोल कार्य लवकरात लवकर पूर्ववत् चालू व्हावे, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

कळावे, लोभ असावा.
आपला
डॉ. जयंत बाळाजी आठवले