पुणे – येथे ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ या नव्या विषाणूचा शिरकाव झाला आहे. या विषाणूने बाधित झालेले २२ संशयित रुग्ण येथे आढळले आहे. त्यातील ६ रुग्ण पुणे शहरातील असून उर्वरित अन्य ठिकाणचे आहे. संशयित रुग्णांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहे. वेगळ्या पद्धतीची लस घेतली असेल किंवा ‘एच्.वन.एन्.वन्.’च्या लस घेतल्या असतील, तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार होऊ शकतो. हा आजार दुर्मिळ असला, तरीही धोकादायक किंवा संसर्गजन्य नाही. ज्या रुग्णालयात संबंधित रुग्ण भरती होते, त्या परिसरातही रुग्णांची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार म्हणजे नेमके काय ?
गुइलेन बॅरे सिंड्रोम यात शरिराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर आक्रमण करते. यामुळे स्नायूंत दुर्बलता, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. हा दुर्मिळ आजार कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो.
आजाराची लक्षणे !
हा विषाणू नसांवर परिणाम करतो. यामुळे स्नायू कमकुवत होतात. वेदना होतात आणि संवेदना न्यून होतात. चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायू यांवर परिणाम होतो. तसेच तात्पुरता अर्धांगवायू होणे, श्वसनाचा त्रास होणे, हाताची बोटे आणि पाय येथे असह्य वेदना होणे, चालतांना समस्या जाणवणे, चिडचिड होणे, असे त्रास होतात.