मलेशियातही आता ‘राम कृष्ण हरि’ चा गजर !
आळंदी (पुणे) – संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे. हिंगोलीमधील नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराज दिंडीचे २९ जुलैला मुंबई मार्गे विमानाने मलेशियाला प्रस्थान झाले असून, तेथे ३ दिवस ‘राम कृष्ण हरि’ चा गजर केला जाणार आहे. २९ जुलैला आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणा करून ही दिंडी मुंबई विमानतळावरून मलेशियाची राजधानी क्वालालंपूरकडे गेली आहे. ‘भक्तीपथ सेवा फाऊंडेशन’, ‘विश्व भ्रमण दिंडी समिती’च्या वतीने ‘श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी’च्या निमित्ताने या ‘विश्व भ्रमण दिंडी मलेशिया २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. संतांची उदात्त भूमिका जगभर समजावी म्हणून आम्ही ‘भक्ती पथयात्रे’च्या माध्यमातून विश्वभ्रमण दिंडी महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेषजी महाराज यांच्यासह उपाध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव हनुमान घोंगडे, सल्लागार अधिवक्ता नीलेश आंधळे यांनी केले आहे. ‘भक्तीपथ सेवा फाउंडेशन, आळंदी’चे उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले की, क्वालालंपूर येथे दिंडी ३० जुलैला पोचली असून तिथे कार्तिक स्वामी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १ आणि २ ऑगस्टला संत नामदेव महाराज यांच्या चरण पादुकांचे पूजन, अभिषेक सोहळा होईल. तिथे आळंदीतील स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सोबत जगदीश चव्हाण, रामेश्वर डांगे, गायत्री गायकवाड यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ हून अधिक भाविकांना ‘संत नामदेव गाथा’ ग्रंथाचे वितरण केले जाणार आहे.
दिंडीच्या माध्यमातून ५१ देशांमध्ये थोर संतांचे विचार पोचवण्याचा संकल्प !
आळंदी येथील स्वामी भारतानंद सरस्वती यांनी सांगितले की, विश्वभ्रमण दिंडीच्या माध्यमातून ५१ देशांमध्ये थोर संतांचे विचार पोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बारामती, जळगाव, धुळे आणि मध्यप्रदेश येथील ६० भाविक, तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाविकही सहभागी होणार आहेत. |