‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व ! सूक्ष्माला स्थुलातून बुद्धीने समजून घेणे, तसे कठीणच. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील कार्याविषयी बुद्धीने काहीतरी लिहिणे धाडसाचे ठरेल किंबहुना ते हिमनगाचे एक टोक असेल. आपल्याला सूक्ष्मातील कळत नसल्याने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्यासाठी काय करत आहेत ?’, हे प्रत्येक वेळी अनुभवता येत नाही; परंतु प्रत्येक साधक काही ना काही अंशी त्यांच्या सामर्थ्याची अनुभूती घेत असतो. त्या अनुभूतींतून त्याची आणि त्या अनुभूती ऐकणार्याची किंवा वाचणार्याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा बळकट होते. त्यामुळे त्यांचे हे सूक्ष्मातील कार्य आपण समजून घेतले, तर ‘आपल्या जीवनात घडणार्या कित्येक घटनांमागे त्यांची कृपा कशी कार्यरत आहे ?’, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटून आपल्या श्रद्धेलाही बळकटी येईल, यासाठी हा लेखप्रपंच !
१. ‘युगानुयुगे चाललेला देवासुर संग्राम या कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून लढत आहेत !’ – कांची कामकोटिपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती
‘देहली येथील एका संमेलनात कांची कामकोटिपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती म्हणाले होते, ‘‘देवासुर संग्राम युगानुयुगे चालू आहे. या कलियुगात हा संग्राम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून लढत आहेत.’’ पूर्वीच्या युगांमध्ये देवांचा असुरांशी थेट लढा होत असल्याचे आपण रामायण, महाभारत इत्यादी आपल्या धर्मग्रंथांत वाचलेले असते. कलियुगात देव आणि असुर दोन्ही सूक्ष्मातून कार्यरत असल्याने त्यांचे अस्तित्व आपल्याला स्थुलातून कळत नाही; परंतु सत्त्व-रज-तम या त्रिगुणांच्या परिभाषेत हा भाग आपल्याला समजून घेता येईल. येथे कलियुगातील देवासुर संग्राम, म्हणजे समाजाचा सत्त्वगुण वाढवून रज-तम गुणांचा नाश करणे. या अंगाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य समजणे सोपे होईल.
(‘कांची कामकोटिपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांनी २८.२.२०१८ या दिवशी देहत्याग केला.’ – संकलक)
२. कोणतेही कार्य स्थुलातून घडण्याआधी सूक्ष्मातून घडलेले असते !
महर्षि वाल्मीकि यांनी रामायण आधी लिहिले. त्यानंतर रामजन्म झाला आणि पुढील रामायण घडले. याचा अर्थ महर्षि वाल्मीकींना रामायणाचा संपूर्ण घटनाक्रम सूक्ष्मातून आधीच ज्ञात होता किंवा असे म्हणू शकतो की, रामायण सूक्ष्मातून आधीच घडून गेले होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश करतांना प्रत्यक्ष सांगितले आणि दाखवलेही की, त्याने (श्रीकृष्णाने) सर्व अधर्मी कौरवांचा नाश आधीच केलेला आहे. अर्जुनाने केवळ निमित्तमात्र व्हायचे आहे. त्यानंतर महाभारताचे युद्ध द्वापरयुगातील कालमानाप्रमाणे १८ दिवस चालले आणि सर्व कौरवांचा नाश झाला. तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमी सांगतात, ‘‘अन्य संतांचे कार्य स्थुलातून अधिक असते. माझे कार्य सूक्ष्मातील अधिक आहे.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी कालांतराने प्रत्यक्ष घडल्याची अनुभूती साधकांनी घेतली आहे. ते बीजरूपाने साधकांना काहीतरी सहज बोलता बोलता सांगतात आणि तसेच फलित साधकांना मिळते. याची काही उदाहरणेही या लेखात पुढे आपण पहाणार आहोत.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी बीजरूपात पेरलेल्या विचाराचा पुढे वटवृक्ष होतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण, म्हणजे हिंदु राष्ट्राची नांदी !
एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘मी जे काही तुम्हाला आज सांगणार आहे, ते कदाचित् तुम्हाला आता कळणार नाही. आज त्याचे आकलन होणार नाही किंवा ते अशक्यप्राय वाटू शकेल; परंतु ते व्यर्थ जाणार नाही. आज नाही, उद्या किंवा या नाही, तर पुढच्या जन्मात ते ज्ञान फलित होऊन तुम्हाला साधनेत पुढे घेऊन जाईल.’’ हे मी व्यष्टी साधनेच्या संदर्भात, तर नेहमीच अनुभवतो. त्यांनी साधनेच्या आरंभी सांगितलेली काही सूत्रे आज अकस्मात् कधीतरी आठवतात आणि माझ्या साधनेला पुढची दिशा देतात.
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या संदर्भात जाणीव करून दिल्यावर काही वर्षांनी योगेश जलतारे यांना त्या विचारांची भीषणता जाणवणे : साधारण वर्ष २००६ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला माझ्यातील काही स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची जाणीव करून दिली. त्या वेळी ते स्वभावदोष किंवा अहं यांच्या अनुषंगाने दृश्य स्वरूपातील काही उदाहरणे माझ्यासमोर नव्हती. साधकांनाही ती मला सांगता आली नाहीत. त्यामुळे मला ती परिस्थिती स्वीकारणे पुष्कळ कठीण गेले; परंतु माझ्या मनात साधना सोडण्याचा विचार नव्हता. असे असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एका साधिकेला म्हणाले, ‘‘बरे झाले लवकर लक्षात आले, नाहीतर जलतारे साधना सोडून गेले असते.’’ त्यांचे हे उद्गार ऐकून मला धक्काच बसला; कारण माझ्या मनाला तो विचारही शिवला नव्हता आणि त्या वेळी तशा विचारांची भीषणता मला जाणवली नव्हती. त्यानंतर बरोबर ३ वर्षांनी माझे ते स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे स्थुलातून प्रकटीकरण झाले आणि मला प्रचंड मनःस्ताप भोगावा लागला. एक वेळ, तर अशीही आली की, ‘मला साधना झेपणार नाही. त्यामुळे परत व्यवहारात जाऊन अर्धवेळ साधना करावी’, असा विचारही माझ्या मनात येऊन गेला; परंतु गुरुकृपेने मी त्या विचाराला बळी पडलो नाही किंबहुना गुरूंनीच मला त्या विचारातून बाहेर काढले. आज या प्रसंगाचा विचार करतो, तेव्हा लक्षात येते, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष २००६ मध्ये आधीच काळाच्या पलीकडे जाऊन मला माझ्यातील सूक्ष्म स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून दिली. त्या वेळी त्यांनी ती करून दिली नसती, तर वर्ष २००९ मध्ये माझा निभाव लागला नसता.’ त्यांनी माझी जी स्थिती सांगितली होती, तेव्हा तिचे महत्त्व माझ्या लक्षात आले नव्हते. हा माझा व्यक्तीगत अनुभव झाला; परंतु असेच त्यांनी २ साधकांच्या संदर्भात सूतोवाच केले होते, ‘ते आता घरी राहून साधना करतात का ?’ तेव्हा ते साधक आश्रमात चांगल्या प्रकारे साधना करत होते; परंतु नंतर अशा काही घटना घडल्या की, ते दोन्ही साधक घरी राहून साधना करू लागले.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काही वर्षांपूर्वी मांडलेल्या ‘हिंदु राष्ट्रा’च्या संकल्पनेचा आज सर्वत्र उद्घोष होत असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ईश्वरी राज्य म्हणा किंवा रामराज्य अथवा हिंदु राष्ट्र म्हणा, याची संकल्पना जेव्हा मांडली, तेव्हा हे शब्दही जनमानसांत रूढ नव्हते. काहींनी ही संकल्पना हसण्यावारी नेली; परंतु आज सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द लोकांच्या मुखात आहे. ‘हिंदु राष्ट्र’ येणारच !’, ही आशा हिंदूंमध्ये पल्लवित झाली आहे.
४. स्थुलाला सूक्ष्माची आणि संकल्पशक्तीची जोड देण्याची शिकवण देऊन साधकांतील रज-तम नष्ट करून त्यांच्यातील सत्त्वगुण वाढवण्याचे अलौकिक कार्य !
आरंभीपासूनच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थुलातील कृतींना सूक्ष्माची जोड देण्याची, म्हणजे स्थुलातील कृतींच्या जोडीला प्रार्थना आणि नामजप करण्याची शिकवण साधकांना दिली. त्याचप्रमाणे ‘प्रत्येकाची साधना चैतन्याच्या स्तरावर कशी होईल ?’, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. ‘हाही त्यांच्या सूक्ष्मातील देवासुर संग्रामाचा एक भाग होता’, हे कसे, ते आपण एका सूक्ष्मातील युद्धाच्या उदाहरणातून समजून घेऊया.
४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना अष्टांग साधना शिकवून स्वयंपूर्ण बनवणे : पूर्वी युद्धामध्ये रथीशी रथी, महारथीशी महारथी आणि अतिरथीशी अतिरथी, असा युद्धाचा स्तर असायचा. गंमत म्हणजे अतिरथी हा रथीचा नायनाट सहज करू शकत असतांना त्याचा थेट वापर होत नसे, तसेच सर्वकाही करण्याचे सामर्थ्य असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतः ते न करता साधकांना अष्टांग साधना शिकवली. यातून त्यांनी साधकांना स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करून त्रासाशी लढायला शिकवले. साधकांना त्यांची स्वतःची संकल्पशक्ती जागृत करून स्वयंपूर्ण बनवले आणि त्यांना त्यासाठी बळ पुरवून स्वतः नामानिराळे राहिले.
४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अष्टांग साधनेच्या माध्यमातून रज-तम गुणांचे प्रतिनिधित्व करणार्या स्वभावदोष आणि अहं रूपी असुरांचा नाश करण्यास शिकवून साधकांतील सत्त्वगुणात वृद्धी करणे : आता ‘अष्टांग साधनेच्या माध्यमातून देवासुर संग्राम कसा शिकवला ?’, तर आपल्यात ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर’ हे षडरिपु म्हणजे असुर आहेत. आपल्यातील विविध स्वभावदोष आणि अहंचे पैलू हे त्यांचे दृश्य रूप. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती, नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती’ या अष्टांग मार्गाने साधकांना त्यांच्यातील देवत्व जागृत करून षड्रिपूंचा नाश करायला शिकवले. ‘वरील षडरिपूंपैकी काही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतून नष्ट होतील; काही नामजपाच्या बळाने नष्ट होतील, तर काही संस्कार सत्सेवा, त्याग, प्रीती इत्यादींचा अवलंब केल्यावर दूर होतील’, हे लक्षात घेऊन त्यांनी साधकांना अष्टांग साधनेच्या बळावर स्वतःतील स्वभावदोषरूपी असुरांशी लढायला शिकवून त्यांच्यातील रज-तम गुणांचा नाश केला आणि साधकांतील सत्त्वगुण वाढवला. यातून वरकरणी दिसतांना अष्टांग साधना स्थूलरूपात दिसत असली, तरी ‘ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अलौकिक कार्य आहे’, हे लक्षात येते.
(क्रमशः)
– श्री. योगेश जलतारे (वय ४८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२३)
|