Kanwar Yatra UP : कावड यात्रा मार्गांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या मालकांनी दुकानांवर त्यांची नावे लिहिवीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुझफ्फरनगरच नव्हे, आता उत्तरप्रदेश राज्यासाठीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अभिनंदनीय आदेश !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील कावड यात्रेच्या मार्गावर असलेल्या सर्व खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या मालकांनी त्यांची नावे दुकानांच्या दर्शनी भागात लावावीत, असा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिला आहे. कावड यात्रेकरूंंचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. याआधी पोलिसांकडून मुझफ्फरनगरमधील दुकाने, ढाबे, तसेच हातगाड्या यांसाठी हा आदेश देण्यात आला होता. त्याला विरोधी पक्षांकडून विरोध होऊ लागल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रेच्या संपूर्ण मार्गावरील सर्वच दुकानांसाठी हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रत्येक खाद्यपदार्थांचे दुकान आणि हातगाडीचे चालक यांना दर्शनी भागात मालकाचे नाव लिहावे लागेल.

याआधी उत्तरप्रदेश राज्य सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी आरोप केला होता की, काही मुसलमान विक्रेते त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देऊन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करत आहेत. ते ‘वैष्णव ढाबा भंडार’, ‘शाकुंभरी देवी भोजनालय’ आदी नावे देऊन मांसाहारी पदार्थांची विक्री करतात. त्यांनी त्वरित नावे पालटावीत, असे आवाहन केले होते.

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांच्याकडून नावे लिहिण्याच्या आदेशाचे समर्थन

मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना (इस्लामचे अभ्यासक) शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी कावड यात्रेच्या मार्गांवरील दुकानांच्या मालकांनी त्यांची नावे लिहिण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाचे समर्थन केले आहे. मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, मुझफ्फरनगर आणि सहारनपूर जिल्हे संवेदनशील आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्याचे दायित्व पोलीस आणि प्रशासन यांचे आहे. कुठेही संघर्ष निर्माण होऊ नये आणि यात्रा शांततेत पार पडावी यासाठी, तसेच धार्मिक सलोखा राखण्यासाठी, हा आदेश आहे. कावड यात्रा हा पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या धार्मिक कार्यक्रमाचे राजकीय आखाड्यात रूपांतर केले. अखिलेश यादव यांना राज्यात कावड यात्रेविषयी हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण करायची आहे. अखिलेश यादव यांनी धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे. तुम्हाला राजकारण करण्याच्या अनेक संधी मिळतील, त्या संधीचा लाभ घेऊन भरपूर राजकारण करा, आमचा आक्षेप नाही.

आदेश सर्व दुकानदारांसाठी आहे ! – माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

मुख्तार अब्बास नक्वी

प्रसारमाध्यमांशी बोलतांना माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, मर्यादित प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वांमुळे या आदेशाविषयी गदारोळ निर्माण झाला होता. मला आनंद आहे की, राज्य सरकारने जो काही धार्मिक गदारोळ निर्माण झाला होता, तो दूर केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने कोणत्याही धर्माच्या लोकांना ही सूचना दिलेली नाही. हा आदेश सर्व दुकानदारांसाठी आहे. कावड यात्रेच्या काळात भाविक खाण्यापिण्याचे अनेक पदार्थ टाळतात. त्यामुळे त्याच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे.

(म्हणे) ‘हिंदु आणि मुसलमान यांच्यात अंतर निर्माण होईल !’ – देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी

लेमा मुफ्ती असद कासमी

देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी म्हटले आहे की, या निर्णयामुळे दोन्ही धर्मियांमध्ये अंतर निर्माण होईल आणि धर्मांधांना संधी मिळेल. ते दुकानात हिंदु आणि मुसलमान, असा भेद करतील. त्यामुळे या आदेशावर पुन्हा विचार करण्यात यावा; कारण तुम्ही पाहिले असेल की, हिंदु धर्माचे लोक प्रतिवर्षी कावड यात्रेला जातात, तेव्हा मुसलमान त्यांच्यासाठी विश्रांतीस्थान निर्माण करतात आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करतात, तसेच पुष्पवृष्टीही करतात. आता सरकारच्या आदेशामध्ये त्यांच्यात अंतर निर्माण होईल. (सरकारने सर्वच दुकानदारांसाठी हा आदेश दिला असल्याने अशा प्रकारचे अंतर निर्माण होण्याचा प्रश्‍नच येत नाही. ‘खावे त्याला खवखवे’ या न्यायानुसार जे ‘थूंक जिहाद’ करतात, जे मुसलमान त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे ठेवतात, अशांनाच या आदेशाचा त्रास होणार आहे. त्यांच्या विरोधात कासमी का बोलत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !