150 Dalit  Will Convert To Islam : भाजपच्या आमदाराविरुद्ध कारवाई न केल्यास १५० दलितांसमवेत इस्लाम स्वीकारीन !

  • जुनागड (गुजरात) येथील काँग्रेस पक्षाच्या दलित प्रमुखाची धमकी !

  • आमदाराच्या मुलाने काँग्रेसच्या मुलावर केले होते आक्रमण !

जुनागड (गुजरात) – भाजपचे आमदार गीताबा जडेजा यांच्या मुलाने येथील काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती संघटनेचे अध्यक्ष राजेश सोलंकी यांच्या मुलावर आक्रमण केले होते. जर जडेजा यांनी त्यागपत्र दिले नाही, तर माझे संपूर्ण कुटुंब आणि दलित समुदायाचे १५० लोक इस्लाम स्वीकारतील, अशी धमकी सोलंकी यांनी दिली आहे.

आमदार जडेजा यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंह उपाख्य गणेश आणि अन्य १० जणांनी सोलंकी यांचा मुलगा संजय याच्यावर आक्रमण केल्याने त्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. आक्रमणाची घटना ३० मे या दिवशी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीच्या घटनेत आमदार जडेजा यांचाही हात असल्याचा आरोप सोलंकी यांनी केला आहे. ‘१५ ऑगस्टपर्यंत सरकार आणि भाजप यांना वेळ देण्यात आला असून आमचे म्हणणे ऐकले गेले नाही, तर आम्ही इस्लाम धर्मात धर्मांतरित होऊ’, असे सोलंकी यांनी सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

हिंसाचाराच्या प्रकरणी योग्य कारवाई झालीच पाहिजे; परंतु याचा अर्थ हा नव्हे की, मागणी पूर्ण झाली नाही, तर धर्मांतर करायचे ! अशांना हिंदु धर्माचे महत्त्व ठाऊक नसल्याचेच दिसून येते !