अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणार्‍यांवर कारवाई !

७ लाख रुपयांचा दंड वसूल !

पुणे – रेल्वेतून प्रवास करतांना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढून रेल्वे थांबवण्याची तरतूद आहे; मात्र काही प्रवासी किरकोळ कारणासाठी अनावश्यक वेळी साखळी ओढून दुरुपयोग करतात. अशा प्रवाशांवर एप्रिल २०२३ ते जून २०२४ या कालावधीत पुणे रेल्वे विभागात १ सहस्र ९९२ गुन्हे नोंद झाले असून १ सहस्र ४४० जणांना कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ७ लाख ७३ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.

रेल्वेतून प्रवास करतांना आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी साखळी ओढण्याची अनुभूती आहे; मात्र काही प्रवासी विनाकारण साखळी ओढत असल्याचे आढळून आले आहे. इतर प्रवाशांना याचा त्रास होऊ नये, गाडी थांबल्याने वेळेत पोचण्यास विलंब होऊन पुढील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते, त्यामुळे विनाकारण साखळी ओढणार्‍या प्रवाशांना रेल्वेच्या कायद्यान्वये कलम १४१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मध्य रेल्वे विभागात ११ सहस्र ४३४ प्रकरणे नोंदवली असून ९ सहस्र ६५७ व्यक्तींवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६३ लाख २१ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तेव्हाच साखळी (अलार्म चेन) ओढण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

संपादकीय भूमिका 

जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !