श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !
‘श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना साधक आणि शिष्य यांचे ध्येय आध्यात्मिक उन्नती हे असते. गुरूंवरील निष्ठा म्हणजे शिष्याची विकल्परहित अवस्था, गुरूंवरील श्रद्धा म्हणजे ‘गुरूंमुळे माझे परमकल्याण होणारच आहे’, असे दृढतेने वाटणे आणि गुरूंवरील भक्ती म्हणजे गुरूंना जे आवडते, ते भक्तीभावाने करणे. गुरूंना व्यापक धर्मकार्य आवडते. ते तळमळीने करणे, ही खरी ‘गुरुभक्ती’ होय. हे कार्य करतांना कुठलाही विकल्प न बाळगणे, ही खरी ‘गुरुनिष्ठा’ होय आणि ‘हे व्यापक धर्मकार्य परिपूर्ण आणि पुढाकार घेऊन केल्याने माझी आध्यात्मिक उन्नती होणारच आहे’, असा भाव असणे, हीच खरी ‘गुरूंवरील श्रद्धा’ होय; म्हणूनच आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी या गुरुपौर्णिमेपासून श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्था
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !
अखिल मानवजातीचे कल्याण करणारा हिंदु राष्ट्र-स्थापनेचा काळ समीप आहे; मात्र ‘आपणांस तो सहजपणे अनुभवायला मिळेल’, असे नाही. त्यासाठी ईश्वरावरील दृढ भक्ती, सत्साठी त्यागाची सिद्धता, मनाची सर्वांगीण सिद्धता अशा सद्गुणांची शिदोरी आपल्यासोबत असली पाहिजे. ती साठवण्यासाठी गुरुपौर्णिमेसारखी अद्वितीय संधी नाही !
गुरुपौर्णिमेनिमित्त एक सहस्र पटींनी कार्यरत गुरुतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी तन, मन आणि धन यांपैकी ज्या जमेल, त्या मार्गाने या उत्सवात, तसेच त्यातील सेवेत सहभागी व्हा ! गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’ अशी प्रार्थना तळमळीने करा ! हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या !
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातन संस्था