Kerala Congress Apologizes : केरळ काँग्रेसने पोप फ्रान्सिस यांचा अवमान करणारी पोस्ट हटवत मागितली क्षमा !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीकेचे केले समर्थन !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – पंतप्रधान मोदी यांनी इटलीमध्ये ‘जी-७’ (अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान या देशांची संघटना) शिखर परिषदेच्या वेळी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. याचे छायाचित्र ‘एक्स’वर पोस्ट करत केरळ काँग्रेसने म्हटले होते, ‘पोपला शेवटी देवाला भेटण्याची संधी मिळाली.’ देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने हा टोमणा मारला होता. निवडणुकीच्या प्रचारात ‘देवाने मला खास कामासाठी पाठवले आहे’, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले होते. काँग्रेसच्या या पोस्टवरून भाजपने पोप यांचा अवमान झाल्याचे म्हणत टीका केली. यानंतर काँग्रेसने ही पोस्ट हटवून क्षमा मागितली.

केरळच्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व्ही.टी. बलराम म्हणाले की, आमची पोस्ट व्यंगासाठी होती. काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता पोप यांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. जगभरातील ख्रिस्ती पोपना देव मानतात. नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात काँग्रेसला अजिबात संकोच नाही. मोदी स्वतःला देव म्हणवून विविध धर्म मानणार्‍या लोकांचा अपमान करतात. पंतप्रधान मणीपूरवर जाणूनबुजून मौन पाळत आहेत. मणीपूरमध्ये ख्रिस्ती समाजाच्या लोकांवर अत्याचार झाले आहेत. चर्च नष्ट केले आहेत. ईशान्येत अल्पसंख्यांकांना दडपशाहीचा सामना करावा लागला आहे; (ईशान्य भारतात ख्रिस्ती आणि मुसलमान नाही, तर हिंदु अल्पसंख्यांक आहेत; मात्र काँग्रेसवाले तेथेही हिंदूंना बहुसंख्य ठरवून त्यांच्यावर टीका करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) परंतु पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. पंतप्रधानांनी अल्पसंख्यांकांविषयी दाखवलेल्या निष्काळजीपणाचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधानांनी ख्रिस्ती समुदायाची क्षमा मागावी.

संपादकीय भूमिका 

ख्रिस्त्यांच्या धर्मगुरूंचा अवमान झाल्यावरून लगेच क्षमा मागणारी काँग्रेस हिंदूंच्या संतांवर मात्र अत्याचार करत आली आहे, हे लक्षात घ्या !