वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा !

नागपूर येथील बहुचर्चित ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकरण

(‘हनी ट्रॅपिंग’ ही एक अन्वेषणात्मक पद्धत आहे. महत्त्वपूर्ण व्यक्तीकडून महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीचा समावेश हेरगिरीच्या पद्धतींमध्येच होतो.)

उजवीकडे निशांत अग्रवाल

नागपूर – येथील बहुचर्चित ब्रह्मोस मिसाइल प्रकरणात वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विद्यमान जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती देशपांडे यांच्या न्यायालयात हा खटला विशेष सरकारी अधिवक्त्या  ज्योती वजानी यांनी चालवला. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर यूनिटमधील निशांत अग्रवाल या अभियंत्याला वर्ष २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. सीनियर सिस्टिम अभियंता असलेला निशांत ‘हनी ट्रॅप’मध्ये फसून ‘हेरगिरी’ करत होता. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आतंकवादी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने )ही कारवाई केली होती.

निशांत याच्याकडून जप्त भ्रमणसंगणकात (‘लॅपटॉप’मध्ये) क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी निगडित माहिती आणि दस्तऐवज मिळाले होते. तो मनोहर काळे यांच्या घरी भाड्याने रहात होता. निशांत हा उत्तराखंडमधील रुडकी येथील रहिवासी आहे. निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसमवेत ‘डी.आर्.डी.ओ.’ची माहिती शेअर करत होता. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला पोचवली जात होती.