|
चंडीगड (हरियाणा) – हरियाणातील ‘डेरा सच्चा सौदा’ या संप्रदायाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे. २२ वर्षांपूर्वी संप्रदायाचे माजी व्यवस्थापक रणजीत यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने एकूण ५ जणांना निर्दोष घोषित केले. यामुळे उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रहित केला आहे.
काय आहे प्रकरण ?
१० जुलै २००२ या दिवशी कुरुक्षेत्र येथील रहिवासी रणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हरियाणातील सिरसा येथे संप्रदायाच्या मुख्यालयात बाबा गुरमीत राम रहीम हे महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती सांगणारे निनावी पत्र रणजित सिंह सर्वत्र पसरवत होते, असा संप्रदायाच्या व्यवस्थापनाला संशय होता. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली, असे सांगितले जाते. हे प्रकरण जानेवारी २००३ मध्ये सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले. ऑक्टोबर २०२१ मध्ये ५ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. यावरच आता उच्च न्यायालयाने सर्व ५ आरोपींना निर्दोष ठरवले.
हे पत्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही पाठवण्यात आले होते. यानंतर सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रात ते पत्र प्रसिद्ध केले. यावरून २१ नोव्हेंबर २००२ या दिवशी पत्रकार छत्रपती यांची हत्या करण्यात आली होती. छत्रपती यांच्या हत्येच्या प्रकरणी राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.