डेहराडून (उत्तराखंड) – चारधाम यात्रेला प्रारंभ होऊन काही दिवस झाले आहेत. चारधाम पैकी बद्रीनाथ आणि केदारनाथ येथील स्थिती नियंत्रणात असली, तरी गंगोत्री अन् यमुनोत्री येथे भाविकांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे. येथील भाविकांच्या संख्येचे सर्व उच्चांक मोडित निघाले आहेत. यमुनोत्रीच्या ४-५ फूट रूंद मार्गावर यात्रेच्या दुसर्याच दिवशी प्रचंड गर्दी झाली होती. यानंतर सरकारने तेथील नियोजनात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष स्थितीत काही पालट झाला नसल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
भाविकांना रस्त्यावर रात्र काढावी लागली !
गेल्या २ दिवसांत झालेल्या विक्रमी गर्दीमुळे मंदिर समितीने यात्रेकरूंना रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शन घेण्याची मुभा दिली आहे. त्यासह गंगा सप्तमीला गंगोत्री येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. येथे वाहतुकीचीही मोठी कोंडी झाली होती. अनेकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढावी लागली. विविध कारणांमुळे आतापर्यंत अनुमाने १० भाविकांचा मृत्यू झाला आहे.
गर्दीवर नियंत्रण आहे ! – जिल्हाधिकारी
उत्तराखंड सरकार आणि पोलीस यांच्या आकडेवारीनुसार गेल्या ४ दिवसांत १ लाख ३० सहस्रांहून अधिक भाविक चारधाम यात्रेसाठी पोचले आहेत. गेल्या वर्षी १६ दिवसांत इतके लोक दर्शनासाठी आले होते. आता दर्शन सुरळीत चालू आहे. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी डॉ. मेहरबान सिंह बिश्त यांनी सांगितले की, सध्या गंगोत्री आणि यमुनोत्री येथील गर्दीवर नियंत्रण आहे. २ दिवस ऑनलाईन नोंदणी बंद ठेवावी लागली.
व्हिडिओ (रिल) बनवणार्यांमुळे गर्दीत वाढ !
चारधाम यात्रेसाठी प्रतिवर्षी गर्दी वाढत आहे. पूर्वी केवळ धार्मिक यात्रांच्या नावाखाली तीर्थयात्रा होत असत. आता अनेक लोक व्हिडिओ (रिल) बनवण्यासाठी येथे येत आहेत. लोकांचे मत आहे की, धार्मिक आणि पूजा स्थळ यांवर व्हिडिओ बनवण्यावर बंदी घातली पाहिजे; कारण यामुळे लोकांचे लक्ष विचलित होते. (यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)