एका विवाहामुळे दोन व्यक्ती, कुटुंब, गावे एकमेकांना आपुलकीने जोडली जातात. याच वैवाहिक आयुष्यात उडालेल्या खटक्यांमुळे जेव्हा ‘घटस्फोट’ घ्यावा लागतो, तेव्हा ती व्यक्तीची सर्वांत मोठी भावनिक हार असते; मात्र आता हीच हार ‘सेलिब्रेट’ (साजरी) करण्याचा ‘ट्रेंड’ (नवरूढी) चालू आहे. अमेरिकी अभिनेत्री एमिली रताजकोव्स्की यांनी ही विकृत कृती केली. अयोध्येत प्रभु श्रीराम विराजमान झाल्यानंतर अखिल विश्वात ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उदयाला येऊ लागला आणि अभिनेत्रीच्या ‘डिव्होर्स रिंग’ या संकल्पनेने ‘कलियुग’ शब्द परत स्मरू लागला !…जणू ‘काळगतीपुढे बुद्धी काय करी ?’…असे झाले आहे ! पतीसाठी प्रत्यक्ष यमाशी झुंजणारी सावित्री; ‘सूर्याेदय होताच पतीचे निधन होणार’, हे कळल्यावर सूर्यालाच निस्तेज करणारी सती, सीताशोधार्थ आणि रक्षणार्थ घडलेले रामायण हा विश्वातील पती-पत्नीच्या प्रेमाचा, त्यागाचा अलौकिक इतिहास भारतात आहे. या पार्श्वभूमीवर ‘डिव्होर्स रिंग’ (घटस्फोट झाल्याची अंगठी) देणे, म्हणजे इतिहासाला काळीमा फासण्यासारखे आहे. ही संकल्पना समाजाच्या अत्यंत रसातळाला गेलेल्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते.
सध्या विदेशातील ही नवरूढी भारतियांसाठी अनुकरणीय होण्यास वेळ लागणार नाही ! भारतियांच्या पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या सवयीमुळेच मोठ्या शहरांतून आधीच संकुचित झालेली कुटुंबव्यवस्था आता अधिक कोलमडू लागली आहे. आपण वेळीच सावध होऊन असे विचार आणि कुप्रथा यांना काही कोस दूर ठेवले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार कलियुगात पती-पत्नी यांचा देवाणघेवाण हिशोब आणि प्रारब्ध हे भोगूनच संपवायचे असतात. हे भोगत असतांना साधना करून त्याची तीव्रता न्यून करण्याचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग हिंदु धर्म सांगतो. एकमेकांपासून वेगळे होणे, हा कायमस्वरूपी उपाय नसतो. काही वेळा तो पळपुटेपणा असतो. जोडीदार, कुटुंब, कार्यालयीन कामाचे ठिकाण, समाज, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी एक ना अनेक. महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत आपला स्वभाव पालटत नाही, तोपर्यंत व्यक्तीने जागा पालटून काही लाभ होत नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराने जगून व्यक्ती एकटी पडत चालली आहे, हे केव्हा लक्षात येणार ? आज मानसोपचारतज्ञ सतत ‘कुणाशी तरी मोकळेपणाने बोला’, असे सांगतात. काहींना त्यांच्या प्रारब्धामुळे, नाईलाज म्हणून किंवा अन्य काही कारणांनी घटस्फोट घ्यावा लागतो. सध्या भारतातही ते प्रमाण वाढले आहे; परंतु तो अंगठी घालून साजरा करणे, ही विकृती नाही का ? पाश्चात्त्यांकडे एकाला घटस्फोट देऊन दुसर्याशी लग्न करणे हे ४-५ वेळाही सहजतेने होते. भारतात हे रूढ होणे कुणाच्याच हिताचे नाही. त्यामुळे भारतियांनी तरी घटस्फोट साजर्या करायच्या या विकृत पद्धतीपासून दूरच राहिलेले बरे !
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी