लसीमुळे होत असलेल्या दुष्परिणामांचा निर्णयाशी संबंध नसल्याचा आस्थापनाचा दावा !
लंडन (इंग्लंड) – ब्रिटीश आस्थापन ‘अॅस्ट्राझेनेका’ जगभरातून त्याने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस मागे घेणार आहे. यापुढे लसीची खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला आहे. ‘द टेलीग्राफ’च्या वृत्तानुसार लसीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय हा व्यावसायिक कारणांमुळे घेतला जात आहे. मध्यंतरी त्याच्या वापरावरून होत असलेल्या दुष्परिणामांच्या आरोपांचा या निर्णयाशी कोणताही संबंध नसल्याचे आस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
१. अॅस्ट्राझेनेकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये ब्रिटीश उच्च न्यायालयात सांगितले होते की, त्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढत असल्याचे आस्थापनाने मान्य केले होते.
२. या लसीमुळे शरिरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि ‘प्लेटलेट्स’ची (रक्तातील एक प्रकार) संख्या अल्प होते. तथापि हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच घडते.
३. अॅस्ट्राझेनेकावर त्याने उत्पादित केलेल्या लसीमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप आहे. आस्थापनाच्या विरुद्ध ब्रिटनच्या उच्च न्यायालयांत ५१ खटले प्रलंबित आहेत. पीडितांनी अॅस्ट्राझेनेकाकडून अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांच्या हानीभरपाईची मागणी केली आहे.
४. शास्त्रज्ञांना ही लस बाजारात आणल्यानंतर काही महिन्यांनी त्याचा धोका लक्षात आला होता. यानंतर ४० वर्षांपेक्षा अल्प वयाच्या लोकांनाही इतर काही लसींचा डोस द्यावा, असे सुचवण्यात आले होते.
५. ब्रिटन सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये ब्रिटनमध्ये १६३ लोकांना हानीभरपाई दिली होती. यांपैकी १५८ जणांना अॅस्ट्राझेनेकाची लस मिळाली होती.