Temple Priests Arrested : मेट्टुपलायम् (तमिळनाडू) येथील वनबद्रकालीअम्मा मंदिराच्या ४ पुजार्‍यांना अटक !

भक्तांनी अर्पण केलेल्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप

प्रातिनिधिक छायाचित्र

मेट्टुपलायम् (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील मेट्टुपलायम येथील वनबद्रकालीअम्मा मंदिराच्या ४ पुजार्‍यांना भक्तांनी अर्पण केलेल्या निधीमध्ये अफरातफर केल्याच्या आरोपाखाली नुकतीच अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आर्.रघुपती (३६ वर्षे), एस्. थंडापाणी (४७ वर्षे), एस्. विष्णुकुमार (३३ वर्षे) आणि एल्. सरावनन् (५४ वर्षे) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेतच या प्रकरणात अडकलेले एक मंदिर विश्‍वस्त पसार झाले आहेत, असे मेट्टुपलायम् पोलिसांनी सांगितले.

कायद्याची कार्यवाही (अंमलबजावणी) करणार्‍या अधिकार्‍यांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या आधारे ४ पुजार्‍यांना मंदिरातील अर्पण ताटातील देणगी घरी नेतांना पकडले. तमिळनाडू हिंदु धर्मादाय (एच्. आर्. अँड सी. ई.) विभागाचे साहाय्यक आयुक्त आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी यू.एस्. कैलासमूर्ती यांनी सांगितले की, मंदिराच्या पुजार्‍यांना सरकारी निर्देशानुसार मंदिरातील अर्पण ताटातील सर्व देणग्या हुंडीमध्ये जमा करणे बंधनकारक आहे. तथापि पुजार्‍यांनी  या नियमाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी पुजार्‍यांच्या विरोधात मेट्टुपलायम् न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.

१४ मार्च २०२४ या दिवशी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, मेट्टुपलायम् पोलिसांनी या अपव्यवहारात गुंतलेले मंदिराचे विश्‍वस्त वसंतम् संपत यांच्यासह ४ पुजार्‍यांच्या विरोधात कारवाई चालू केली. त्यानंतर २५ एप्रिल २०२४ या दिवशी पोलिसांनी ४ पुजार्‍यांना अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

द्रमुक सरकारवर टीका

या प्रकरणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यांची ही कृती हिंदुद्वेष आणि भेदभाव यांचे उदाहरण आहे. प्रख्यात लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या एका ‘पोस्ट’मध्ये पुजार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असते, तर मंदिर हुंडीतील निधीचा सरकारकडून अपहार केला जात असल्याचा आरोप केला आहे. भक्तांनी आरतीच्या ताटात अर्पण केलेले दान पुजार्‍यांकडे ठेवण्याची प्रथा आहे. या प्रथेत राज्य सरकार ढवळाढवळ करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.