Samudra Manthan : समुद्रमंथनातील ‘वासुकी’ सापाच्या इतिहासावर विज्ञानाचा शिक्का !

  • गुजरातमध्ये ४० दशलक्ष वर्षे जुने आवाढव्य सापाचे जीवाश्म सापडले !

  • जागतिक वैज्ञानिक मासिक ‘स्प्रिंगर नेचर’मध्ये शोधनिबंध प्रसारित !

कर्णावती (गुजरात) – हिंदु धर्मग्रंथात ५० फूट लांबीच्या वासुकी सापाविषयीचा एक प्रसंग वर्णिला गेला आहे. या सापाचा उपयोग देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन करण्यासाठी दोरीच्या रूपात केला होता. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केले होते. आता गुजरातच्या कच्छमधील उत्खननात असे सापडले आहे, ज्यामुळे अशा महाकाय प्राण्यांच्या अस्तित्वाची पुष्टी होत आहे.

उत्खननाच्या वेळी अशा सापांचे जीवाश्म सापडले आहेत. त्याला ‘वासुकी इंडिकस’ असे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे.

सौजन्य : KVUE

आयआयटी रूडकीच्या शास्त्रज्ञांना संशोधनाच्या वेळी ही माहिती मिळाली. या शोधामुळे केवळ प्राण्यांची उत्क्रांतीच नाही, तर प्राचीन सरपटणार्‍या प्राण्यांशी भारताचा संबंधही उघड झाला आहे. ‘वासुकी’ साप भारतात आले आणि ते युरेशियातून उत्तर आफ्रिकेत पसरले. याचा शोधनिबंध ‘स्प्रिंगर नेचर’ या जर्मनीतील जागतिक वैज्ञानिक मासिकातही प्रसिद्ध झाला आहे.

आयआयटी रूडकीच्या पृथ्वीविज्ञान विभागाचे अध्यक्ष सुनील वाजपेयी यांनी सांगितले की, या सापांची लांबी ११ मीटर (३६ फूट) ते १५ मीटर (४९.२२ फूट) इतकी आहे. त्याचे जीवाश्म कच्छमधील पणंध्रो गावात तपकिरी कोळशाच्या खाणीत सापडले आहेत. ते अनुमाने १२ सहस्र वर्षांपूर्वी नामशेष झाले. हा शोध आपल्याला इओसीन युगात, म्हणजे किमान ३.३९ कोटी वर्षांपूर्वीच्या युगात घेऊन जातो. हे जीवाश्म वर्ष २००५ मध्येच सापडले होते; पण इतर प्रकल्पांना प्राधान्य दिल्याने त्यावर सखोल अभ्यास झाला नाही. आधी अनेकांना वाटायचे की, ते जीवाश्म मगरीचे आहे; पण पुन्हा अभ्यास केल्यावर ते सापाचे असल्याची नोंद झाली.