पुणे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित शोभायात्रा उत्साहात पार पडली !

 रा.स्व. संघाच्या शोभायात्रेत सहभागी सनातन संस्थेचे साधक

पुणे, १३ एप्रिल (वार्ता.) – येथे नागरिकांनी ठिकठिकाणी नववर्षाचे शोभायात्रेद्वारे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय अनेक संघटना, संस्था यांनी सार्वजनिक गुढीही उभारली. याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनेही ९ एप्रिलला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चौकाचौकांत रांगोळ्या काढून नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले. या शोभायात्रेत सनातन संस्थेचे साधक हातात फलक घेवून सहभागी झाले होते. यामध्ये वारजे शाखेचे संघाचे प्रमुख श्री. स्वप्निल भेंडे यांनी सनातन संस्था शोभायात्रेत सहभागी झाल्याने संस्थेचे विशेष कौतुक केले. या शोभायात्रेत विश्व मांगल्य, तेजस्विनी लेझीम पथक, गोकुळनगर पठार येथील २ आणि वारजे माळवाडी येथील १ भजनी मंडळ/ वारकरी दिंडी सहभागी झाले होते. या शोभायात्रेचा आरंभ ज्ञानेश्वरी उद्यान, वारजे येथून झाला आणि पॉप्युलरनगर, वारजे दत्त मंदिर येथे सांगता समारोह झाला.

शिवकालीन शस्त्र विद्येची प्रात्यक्षिके !

या वेळी मुळशी तालुक्यातील श्री. कुंडलिक कचले यांच्या प्रसिद्ध शौर्य पथकाकडून शिवकालीन शस्त्र विद्येची प्रात्यक्षिके (लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा, भाला इत्यादी) सादर करण्यात आली.