पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून शोभायात्रेद्वारे नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत !

पुणे – येथे घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी कडुलिंबाचा पाला, आंब्याचे डहाळे, साखरेच्या गाठी, फुलांच्या हाराने सजलेली गुढी उभारण्यात आली. याशिवाय अनेक संघटना, राजकीय पक्ष यांनी चौकांमध्ये, समाजमंदिरात सार्वजनिक गुढीही उभारली.

‘राष्ट्रीय कला अकादमी’च्या वतीने शोभायात्रा !

‘राष्ट्रीय कला अकादमी’च्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून ही शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी चौकाचौकांत रांगोळ्या काढून कलाकारांनी स्वागत केले. ज्येष्ठ कलाकारही या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या वेळी अकादमीचे संचालक मंदार रांजेकर, अतुल सोनावणे, अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, गणेश माने आदी उपस्थित होते.

हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने मातृशक्ती, शौर्य रथांसह शोभायात्रा !

विविध क्षेत्रांत पद्मश्री पुरस्कार मिळवलेल्या महिलांच्या कार्याची महती सांगणारा मातृशक्ती रथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा असलेल्या शौर्य रथासह हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा ते श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी शोभायात्रा काढण्यात आली.

या वेळी रा.स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर, ‘भाऊ रंगारी मंडळा’चे अध्यक्ष संजीव जावळे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शेखर मुंदडा, सुनील देवधर आदी सहभागी झाले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्यातील अनिल जेधे, राजाभाऊ भिलारे, मारुति गोळे, रूपाली देशपांडे या वंशजांच्या हस्ते ग्रामगुढी उभारण्यात आली.

तुळशीबागेत पवमान अभिषेक !

ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराममंदिरात श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णुसहस्रनाम, श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त पठणांसह राम नामाच्या जयघोषात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तींस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख आणि दागिने घालण्यात आले. ‘श्री रामजी संस्थान तुळशीबाग’च्या वतीने ९ ते २७ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.