याचक आणि भिकारी यांच्यात भेद आहे. याचक अनेक प्रकारचे आहेत. त्यांच्यातही एक प्रकारची नीती असते. ‘गुर्वर्थमर्थी श्रुतपारदृश्वा ।’ (रघुवंश, सर्ग ५, श्लोक २४) म्हणजे ‘ज्ञानात पारंगत, गुरुदक्षिणेसाठी याचक’, म्हणजे ‘गुर्वर्थं गुरुदक्षिणार्थं यथा तथाऽर्थी याचकः ।’ (रघुवंश, सर्ग ५, श्लोक २४ वरील मल्लिनाथाची टीका) म्हणजे ‘‘गुर्वर्थमर्थी’ या शब्दातील ‘गुर्वर्थं’ म्हणजे गुरुदक्षिणेसाठी आणि ‘अर्थी’ म्हणजे याचक’ असे म्हटले आहे. याचकाचा हेतु भव्य असावा लागतो. त्यात स्वार्थाचा लवलेश नसावा; म्हणूनच कौत्सासारखा याचक आणि काही न करता भीक मागणाराही याचक, या दोघांच्या हेतूत, तसाच दोघांतही आकाश-पाताळाचा भेद आहे; म्हणूनच गुरुदक्षिणा देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा धन मागण्यासाठी वरतन्तु ऋषींचा शिष्य कौत्स हा रघुराजाकडे आला. तेव्हा विश्वजित यज्ञ केल्याने पूर्णतः अकिंचन बनलेल्या रघुराजाने कौत्सला रिक्त हस्ताने परत न पाठवता, त्याला एक दिवस अतिथीशाळेत मुक्काम करायला सांगितला आणि त्याची योग्य कामना पूर्ण करण्यासाठी कुबेरावर स्वारी करायचे ठरवले. रघुराजाच्या बेताची माहिती कुबेराला कळताच त्याने रात्री रघूच्या खजिन्यात सोन्याचा पाऊस पाडला. ते सोने १४ कोटींपेक्षा कितीतरी अधिक होते. ते सर्वच्या सर्व रघुराज कौत्साला देऊ लागला; कारण त्याच्यासाठीच ते मिळवले होते; पण गुरुदक्षिणेपेक्षा अधिक द्रव्य घेण्यास कौत्स तयार झाला नाही आणि अधिक द्रव्य रघु आपल्या जवळ ठेवीना. असा गोड झगडा केवळ भारतीय संस्कृतीतच आढळतो.
(साभार : ग्रंथ ‘भारतीयांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)