आचारसंहितेचे काटेकोर पालन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

‘काय करावे, काय करू नये’ राजकीय पक्षांना सविस्तर मार्गदर्शन

रत्नागिरी – आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे ? काय करू नये ? नामनिर्देशनपत्र कसे भरावे ? याविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याविषयीही त्यांनी आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणिअधिकारी उपस्थित होते. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले,

एम्. देवेंदर सिंह

१. भारत सरकारच्या ‘पोर्टल’वर याविषयी सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: नाम निर्देशनपत्राविषयी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी.

२. वयस्कर, तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे.

३. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० वापरावा. लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखवणे याविषयी काही तक्रारी असतील, तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष २४ तास चालू आहे.

‘जिल्हाधिकारी यांनी ८ प्रकारचे आदेश लागू केले आहेत. या आदेशांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. त्यानुसारच अनुमतीही घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुजार यांनी सांगितले.  यानंतर खर्चाचे दर ठरवण्याविषयी बैठक झाली.