Pope Francis Ukraine : युक्रेनने संवादाच्या माध्यमातून वाद संपवण्याचे धाडस दाखवावे !

पोप फ्रान्सिस यांचा युक्रेनला सल्ला !

व्हॅटिकन सिटी – युक्रेन सरकारने रशियासमवेत चालू असलेला वाद संवादाच्या माध्यमातून संपवण्याचे धैर्य दाखवले पाहिजे, असा सल्ला ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी स्वित्झर्लंडमध्ये दिलेल्या मुलाखतीत दिला. यापूर्वी रशियाने म्हटले होते की, कोणतेही विदेशी साहाय्य या युद्धाचा मार्ग पालटू शकत नाही.

सौजन्य : euro news

पोप पुढे म्हणाले की,

१. वाटाघाटी आत्मसमर्पणासाठी नाही, तर देशाला वाचवण्यासाठी असतात !

जेव्हा तुम्ही पहाता की, तुमचा पराभव झाला आहे, तसेच काही गोष्टी ठीक होत नाहीत, तेव्हा तुमच्यात वाटाघाटी करण्याचे धाडस असायला हवे. वाटाघाटी कधीच आत्मसमर्पणासाठी नसतात, तर देशाला वाचवण्यासाठी असतात.

२. मध्यस्थीसाठी इतर देशांचे साहाय्य घ्या !

तुम्हाला लाज वाटेल; पण युद्ध चालू होऊन वर्षे किती झाली ? योग्य वेळी बोला आणि मध्यस्थीसाठी इतर देशांचे साहाय्य घ्या.

३. जो सर्वांत बलवान असतो, तो वाटाघाटी करतो !

युक्रेनमधील लोकांमध्ये आत्मसमर्पण आणि पांढरा ध्वज, यांविषयी चालू असलेल्या चर्चेविषयीपोप यांना विचारण्यात आले असता पोप म्हणाले, ‘मला वाटते की, सर्वांत बलवान तो आहे, जो परिस्थिती पहातो, जो लोकांचा विचार करतो आणि पांढर्‍या ध्वजाचे (शांततेचे) धैर्य दाखवतो अन् वाटाघाटी करतो.’