तमिळनाडूमध्ये अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा द्रमुकचा नेता जफर सादिक याला अटक !

या प्रकरणी राज्याचे मंत्री उदयनीनिधी स्टॅलिन यांचीही होणार चौकशी

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

वर्तुळात आरोपी जफर सादिक

चेन्नई (तमिळनाडू) – अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन्.सी.बी.) आणि देहली पोलीस यांच्या संयुक्त पथकाने तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचा नेता आणि चित्रपट निर्माता जफर सादिक याला देहलीतून अटक करण्यात आली. गेल्या मासापासून तो पसार होता. तो चेन्नई, थिरूवनंतपूरम्, मुंबई, पुणे, कर्णावती आणि जयपूर या शहरांमध्ये लपत होता. तो देहलीत आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली. तो २ सहस्र कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत होता. त्याची तस्करी भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मलेशिया या देशांत केली जाते. चौकशीत त्याने सांगितले की, तो द्रमुकच्या अनिवासी भारतियांच्या शाखेचा चेन्नई पश्‍चिम उपसंघटक आहे. गेल्या महिन्यात त्याच्या टोळीतील ३ जणांना अटक केल्यानंतर त्याचे नाव उघड झाले होते. यानंतर द्रमुकने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. जफर सादिक याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ७ लाख रुपये दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यातील ५ लाख रुपये पूरग्रस्तांच्या साहाय्यनिधीसाठी, तर २ लाख रुपये पक्षनिधी म्हणून देण्यात आले होते. त्याने कोणत्या माध्यमातून हे पैसे कमावले ?, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

सौजन्य  ANI News

१. जफर सादिक याचे उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह राज्यसभेचे खासदार एम्.एम्. अब्दुल्ला, द्रमुकचे सचिव एन्. चित्ररसू, तसेच द्रमुकच्या अनेक नेत्यांशी जवळचे आहेत.

२. एन्.सी.बी.चे उपमहासंचालक ज्ञानेश्‍वर सिंह यांनी सांगितले की, सादिकचे तामिळ आणि हिंदी चित्रपट उद्योगात खोलवर संबंध आहेत. या प्रकरणाशी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. एन्.सी.बी.चा निष्पक्ष आणि कायदेशीर तपासावर विश्‍वास आहे. गुन्हेगाराला जात, धर्म किंवा राजकीय पक्ष नसतो. जो कुणी कायद्याचे उल्लंघन करतो, तो गुन्हेगार असतो. आम्ही अशा सर्व प्रकरणांची चौकशी करू.

३. देहलीतील बसई दारापूर भागात सादिक याच्या आस्थापनाच्या गोदामावर धाड घालून ५० किलो ‘स्यूडोफेड्रिन’ हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील अधिकार्‍यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड घालण्यात आली होती. येथे नारळ पावडर आणि मिश्रित अन्न पावडर यांच्या माध्यमातून भारतातून मोठ्या प्रमाणात ‘स्यूडोफेड्रिन’ विदेशात पाठवले जात होते.

४. एन्.सी.बी.ने सांगितले की, जफर सादिक याने अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळालेला पैसा चित्रपट निर्मिती, बांधकाम क्षेत्र आणि अन्य व्यवसायांमध्ये गुंतवला आहे. या पैशांतून त्याने ‘मंगाई’ या तमिळ चित्रपटाची निर्मिती केली असून त्याचे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित झाले आहे. चेन्नईत त्याने हॉटेलही बांधले आहे.

सादिकच्या टोळीचा बुरखा फाडला पाहिजे ! – भाजप

के. अण्णामलाई

तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई म्हणाले की, गेल्या ३ वर्षांत द्रमुकच्या अनेक नेत्यांशी जवळीक साधलेल्या सादिक याने आर्थिक गैरव्यवहाराचे काम कसे केले ? हे उघड होणेे महत्त्वाचे आहे. या प्रकरणी आम्ही अंमलबजावणी संचालनालयाला सखोल चौकशी करण्याची आणि सादिकच्या टोळीचा बुरखा फाडण्याची विनंती करत आहोत. तमिळनाडूतील अमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे थांबली पाहिजे.

सादिकला पोलीस महासंचालकांकडून भेटवस्तूही मिळाल्या होत्या ! – अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्ष

अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाचे सरचिटणीस ए.के. पलानीस्वामी म्हणाले की, जफर सादिक याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यापर्यंत कसे संबंध निर्माण केले ?, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी लोकांना द्यावे. जफर द्रमुकच्या नेतृत्वाशी जवळीक साधत होता आणि त्याला पोलीस महासंचालकांकडून भेटवस्तूही मिळाल्या होत्या. (हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे ! या आरोपाचीही सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे ! – संपादक) हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे.

संपादकीय भूमिका 

सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !