सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी ! – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नेसाई (गोवा) येथे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू (उजवीकडे) यांना निवेदन देतांना शिवप्रेमी श्री. सत्यविजय नाईक आणि शेजारी श्री. दत्तात्रय आमोणकर

मडगाव, २६ फेब्रुवारी (वार्ता.) : सां-जुझे-दि-आरियल येथे एका खासगी जागेत १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीचे गोळे फेकून आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. सरकारने या दबावाला बळी पडून गुन्हे मागे घेऊ नयेत, तर उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवप्रेमींनी २६ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांना दिले आहे.


हे ही वाचा – गोवा : (म्हणे) ‘बाहेरून येऊन तणाव निर्माण करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !’ – स्थानिक ग्रामस्थांची मागणी


निवेदनात म्हटले आहे की, पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?

कडेकोट पोलीस बंदोबस्त असतांना मंत्रीमहोदयांवर मातीचे गोळे फेकून मारणे, कर्तव्य बजावतांना पोलिसांना अडवणे, असे करण्याचे धाडस स्थानिकांमध्ये कुठून आले ? पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. दबावाला बळी पडून गुन्हे मागे घेतल्यास त्यातून राज्यभर चुकीचा संदेश जाऊन अशा घटनांची पुनरावृत्ती नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यापूर्वी शिवप्रेमींनी मंत्री सुभाष फळदेसाई यांची शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या संदर्भात भेट घेतली.