१. सावरकर यांचे भारतरत्न कुणी अडवले आहे ?
आपल्या देशात दिले जाणारे मोठे सरकारी पुरस्कार किंवा सन्मान अनेकदा बुचकळ्यात पाडणारे असतात. ते मिळणार्या अनेक व्यक्तींना ‘ते का दिले गेले असतील ?’, असा प्रश्न आपल्याला पडतो. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील संसदेचे सदस्य झालेले अब्दुल गफार खान यांना ‘भारतरत्न’ दिले गेले. गांधींचे सहकारी म्हणून त्यांचा ‘सरहद्द गांधी’ असा विशेष सन्मान करण्यात आला. मुंबईच्या वरळीतील रस्त्यालाही त्यांचे नाव दिले गेले. मराठी माणसांविषयी अत्यंत आकसाने वागणारे आणि एरव्हीही वादग्रस्त असलेले मोरारजी देसाई हेसुद्धा ‘भारतरत्न’ ? मदर तेरेसा यांना ‘नोबेल’ पारितोषिक मिळाल्यावर घाईघाईने ‘भारतरत्न’ दिले ! मग प्रश्न असा पडतो की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यामध्ये नक्की अडचण काय आहे ? कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी हे ‘भारतरत्न’ झाले. समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यांनाही ‘पद्मविभूषण’ देण्यात आले होते. मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भारतरत्न कुणी अडवले आहे ?
२. सावरकर यांची महानता ठाऊक असल्याने त्यांना ‘भारतरत्न’ देणे अपेक्षित !
आपल्या गृहमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले होते, ‘भारतरत्न’ देण्यासाठी कुठल्या राज्याने किंवा संस्थेने शिफारस किंवा प्रस्ताव देण्याची आवश्यकता नसते.’ सुदैवाने आताच्या सत्ताधार्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी सर्वांत अधिक ठाऊक आहे. सत्तेवर येऊन १० वर्षे झाली, तरी सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात त्यांना अडचण काय आहे ?
३. सावरकर यांना ‘भारतरत्न’ न देण्यास ब्रिटिशांशी काही ‘समझौता’ (करार) झाला आहे का ?
पूर्वी म्हटले जात होते की, पूर्वीच्या सरकारने ब्रिटिशांजवळ काही गुप्त ‘समझौता’ केला असावा; कारण ‘नेताजी सुभाषचंद्र बोस हे जर भारतात आले, तर त्यांचे स्वागत नंग्या तलवारीने केले जाईल’, असे वक्तव्य एका मोठ्या नेत्याने केले होते. सावरकर यांच्या संदर्भातही पूर्वीच्या सरकारने असा काही करार केला होता का ? तसे नसेल, तर आता त्यांना ‘भारतरत्न’ देण्यामध्ये नक्की अडचण काय आहे ? जर करार केला गेला असेल, तर तो या सरकारने सरळ घोषित करावा. त्यात गुप्तता कशाला ? गुप्तता पाळली जात असेल, तर तो या देशासमवेत केलेला अप्रामाणिकपणाच नव्हे का ?
४. सावरकर सगळ्यांना पुरून उरले आणि मृत्युंजयी ठरले !
नेताजी सुभाषचंद्र बोस स्वतंत्र भारतामध्ये कधीच येऊ शकले नाहीत; कारण ब्रिटिशांसमवेत गुप्त करार करण्यात आला होता की, ‘जर नेताजी स्वतंत्र भारतामध्ये परतले, तर त्यांना ब्रिटिशांचे युद्ध बंदीवान म्हणून ब्रिटिशांच्या स्वाधीन केले जाईल’, असे सांगितले जाते. अन्य क्रांतीकारकांना तर ब्रिटिशांनी फाशी देऊन ठार मारले होते. ‘सावरकर हे आयुष्यभर विविध रोगांनी त्रस्त होऊन कारागृहातच जीवन संपवतील’, अशी स्वप्ने बघितली जात होती. त्यामुळे त्यांचेही हाल करण्यात आले; पण ब्रिटिशांच्या आणि नंतरच्या सरकारच्या दुर्दैवाने सावरकर हे सगळ्यांना पुरून उरले आणि मृत्युंजयी ठरले !
– श्री. मकरंद करंदीकर, अंधेरी, मुंबई. (१२.२.२०२४)