अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या !

प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत.

श्री रामलला मूर्ति ( अयोध्या )

१. प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्याविषयी

प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी नियमितच गर्दी होत आहे. पहाटेपासून भाविक दर्शनासाठी येत आहेत; परंतु दर्शनाची व्यवस्था चांगली असल्यामुळे गर्दी असली तरी किमान दीड घंट्यांमध्ये श्रीरामाचे दर्शन व्यवस्थितरित्या होते. मंदिर पहाटे ४.३० वाजता दर्शनासाठी उघडतात. त्यापूर्वीच भाविक दर्शनासाठी बाहेर रांग करतात. त्यामुळे पहाटे लवकर गेल्यास लवकर दर्शन होईल. त्यानंतर भाविकांची गर्दी वाढत जाते. रात्री १० वाजता शेज आरती झाल्यावर मंदिर बंद केले जाते.

अयोध्या येथे श्रीरामललांच्या दर्शना करिता होणारी भाविकांची गर्दी( प्रतिकात्मक छायाचित्र )

२. दर्शनासाठी जातांना अर्पण किंवा फुले यांव्यतिरिक्त काही न नेलेले चांगले !

दर्शनासाठी जातांना भाविकांच्या खिशात कंगवा, पेन, औषधाच्या गोळ्या, पाण्याची बाटली आदी साहित्य सापडते. सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे साहित्य आत नेण्याला अनुमती नाही. त्यामुळे भाविकांकडे अशा प्रकारचे साहित्य ते देवस्थानच्या लॉकरमध्ये जमा करण्यास सांगितले जाते. त्यामुळे साहित्य जमा करण्यात साधारण अधिक अर्धा घंटा जातो. साहित्य निवासस्थानी ठेवल्यास ते लॉकरमध्ये जमा करण्यात जाणारा वेळ वाचेल. त्यामुळे दर्शनासाठी जातांना अर्पण आणि फुले या व्यतिरिक्त अन्य काही वस्तू न नेल्यास चांगले. आम्ही गेलो असतांना एका भाविकाने कानाला श्रवणयंत्र लावले होते; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना श्रवणयंत्र काढण्यास सांगितले. त्या दृष्टीने भाविक दक्षता घेऊ शकतात. चप्पल ठेवण्यासाठी आतमध्ये व्यवस्था आहे. त्यामुळे बूट किंवा चप्पल घालून जाण्यास काहीच अडचण नाही.

३. थंडीचा त्रास होणार्‍यांनी पायात मोजे घालणे आवश्यक !

श्री. प्रीतम नाचणकर

आम्ही दर्शनाला गेलो असतांना मध्येच एका भागात मॅट नव्हते. त्या ठिकाणी भाविकांना लादीवर पाय ठेवायला लागू नये, यासाठी ज्या ठिकाणी मॅट आहे. त्या भागावर भाविकांना उभे रहाण्याची विनंती पोलीस करत होते. एखाद्या ठिकाणी मॅट नसल्यास मोजे नसलेल्या भाविकाला लादीवर उभे राहिल्याने पाय थंडीने गार पडू शकतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरात जाईपर्यंत लादीवर मॅट अंथरण्यात आले आहे; मात्र पहाटे पुष्कळ गारवा असतो. मोजे नसल्यास पाय गार होतात. त्यामुळे पायात मोजे असलेले चांगले.

४. दर्शनासाठी किती वेळ मिळतो ?

भाविकांची गर्दी असल्यामुळे सध्या तरी मंदिरात बसण्यासाठी अद्याप अनुमती दिली जात नाही. रांग टिकून रहावी, यासाठी मंदिरातही रांगेच्या दोन्ही बाजू लाकडाने बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना त्याच्या बाहेर जाता येत नाही. साधारण अर्ध्या मिनिटात दर्शन घेऊन पुढे सरकावे लागते. श्रीरामाच्या मूर्तीपुढे अधिक वेळ थांबल्यास मागील भाविकांना विलंब होऊ शकतो आणि रांगही वाढू शकते. त्यामुळे मंदिरात सुरक्षेसाठी असलेले पोलीस भाविकांना लवकर पुढे सरकण्याचे आवाहन करतात.

५. मंदिराच्या बाहेर येऊन थोडा वेळ थांबण्याची संधी

श्रीरामाचे बालरूप इतके मनमोहक आहे की, डोळ्यांत भरून घेऊ तितका वेळ अल्पच आहे; परंतु भाविकांच्या गर्दीमुळे मंदिरात थांबणे शक्य होत नाही. पोलिसही अधिक वेळ भाविकांना मंदिरात थांबू देत नाहीत. असे असले, तरी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर भाविक थोडा वेळ थांबून रामरक्षा, नामजप आदी करता येऊ शकते. मंदिराच्या बाहेरही पोलीस अधिक वेळ थांबू देत नाहीत; मात्र भाविकांची श्रद्धा लक्षात घेता पोलीस हटकत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या बाहेर येऊन आपण तारतम्याने श्रीरामाचे रूप डोळ्यांपुढे आणून मनोभावे मानस वंदन, मानस पूजा करू शकतो.

६. निवासव्यवस्थेविषयी

प्रभु श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमापासून येथील हॉटेल्सचे दर वाढवण्यात आले आहेत; परंतु अयोध्यानगरीत ठिकठिकाणी काही मठांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पती-पत्नी आणि मुले आदी एक कुटुंब असल्यास साधारण २४ घंट्यांसाठी ३ सहस्र रुपये इतका दर आहे. यामध्ये यामध्ये भोजनाची व्यवस्था येत नाही. या व्यतिरिक्त केवळ निवासाची व्यवस्था, म्हणजे केवळ झोपणे आणि अंघोळ यांपुरती व्यवस्था असलेलेही मठ आहेत. यामध्ये सभागृहात झोपायला दिले जाते. यामध्ये २४ घंट्यांसाठी साधारण ३०० ते ५०० रुपये घेतात. या ठिकाणी यामध्ये अंघोळीची व्यवस्थाही असते. मित्र एकत्रित असल्यास त्यांच्यासाठी अशा प्रकारे सभागृहात झोपण्याची व्यवस्था चांगली ठरते. या ठिकाणी थंडीपासून रक्षण होण्यासाठी जाड लोकरीची गोधडीही दिली जाते. काही ठिकाणी महिलांसाठीही सभागृहात झोपण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी स्वत:कडील साहित्याची मात्र काळजी घ्यायला हवी. येणारे भाविकच असल्यामुळे अशा ठिकाणी तसे सुरक्षित वातावरण आहे, तसेच मठामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही लावलेले असतात.

थंडीच्या दृष्टीने इनर, स्वेटर, जॅकेट, कानटोपी, मफलर, हात-पाय यांचे मोजे, उबदार शाल आदी थंडीपासून सुरक्षिततेच्या दृष्टीने हे साहित्य भाविकांनी आवर्जून आणायला हवे.

७. न्याहारी आणि भोजन यांसाठी व्यय करण्याची आवश्यकता नाही !

अयोध्यानगरीत ठिकठिकाणी महाप्रसादाचे भंडारे आहेत. आमच्या पहाण्यात तर अयोध्यानगरीच्या परिसरात विविध १५-२० भंडारे आढळून आले. अनेक भंडारे सकाळी ७-८ वाजल्यापासूनही चालू होतात. या सर्व भंडार्‍यांमध्ये भोजनाची व्यवस्था उत्तम असते आणि भोजनही गरमगरम असते. श्रीरामजन्मभूमीच्या काही अंतरावर असलेल्या जनकमहल येथे सकाळी ८ वाजल्यापासूनच मद्रास येथील एका संघटनेच्या वतीने इडली सांबार आणि गरमगरम उपीट अशी न्याहारी देण्यात येत होती. अशा प्रकारे ठिकठिकाणी भंडारे आहेत. त्यामुळे उपाहारगृहात न्याहारी आणि महाप्रसादावर व्यय करण्यापेक्षा भाविक भंडार्‍यांचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे या सर्व भंडार्‍यांमध्ये पोट भरेपर्यंत पुन:पुन्हा भोजन दिले जाते; मात्र अन्नाची नासाडी करू नका, एवढीच त्यांची माफक विनंती असते. थोडक्यात सांगायचे, तर भोजन आणि न्याहारी यांसाठी बाहेर व्यय करण्यापेक्षा भाविकांनी या भंडार्‍यांचा लाभ घ्यावा.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

–  श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, अयोध्या. (५.२.२०२४)


पवित्र क्षेत्राचा आध्यात्मिक लाभ घ्या !

राम मंदिराचा प्रस्तावित आराखडा

रांगेत दर्शनासाठी असलेल्या भाविकांपैकी कुणी नामजप करत असतात, अधूनमधून ‘जय श्रीराम’असा जयघोष करत असतात, कुणी श्रीरामाचे भजन करत असतात, तर कुणी श्रीरामाची गाणी म्हणतांना पहायला मिळतात. एकूणच भमाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. शेकडो वर्षे तंबूमध्ये विराजमान असलेल्या रामलल्लाला (श्रीरामाचे बालकरूप) भव्य मंदिरात आलेले पाहून भाविकांचा भाव दाटून येतो. अनेकांना अश्रू अनावर होतात. भाविकांचा अष्टसात्त्विक भाव जागृत होतो. अशा भावावस्थेत प्रभु श्रीरामाविना काहीच दिसत नाही. अनेक जण मंदिराचे खांब, मंदिराच्या पायर्‍या यांवर डोक टेकवून श्रीरामरायाच्या अस्तित्वाचा अनुभव घेतात. प्रभु श्रीरामाच्या दर्शनाचा हा क्षण अविस्मरणीय असतो. भाविकांनी या प्रत्येक क्षणाचा आध्यात्मिक लाभ घ्यावा. प्रभु श्रीरामाचे पाय ज्या भूमीवर पडले त्या पवित्र भूमीप्रती भाविकांची श्रद्धा अनन्य आहे. त्यामुळे अयोध्येतील माती भाविकांसाठी पवित्र आहे. कुणाला अयोध्येतील माती स्वत: समवेत घ्यावयाची असल्यास मंदिराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना माती घेता येऊ शकते. माती ठेवण्यासाठी एखादी झीप असलेली प्लास्टिकची पिशवी समवेत ठेवल्यास त्यामध्ये माती ठेवता येते. मंदिरातून बाहेर पडतांना भाविकांना प्रसाद दिला जातो.

– श्री. प्रीतम नाचणकर

संपादकीय भूमिका

प्रभु श्रीरामाच्या दर्शनाचा हा क्षण अविस्मरणीय असून स्वतःला त्याचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अपेक्षित !