बांगलादेशातील हिंदूंमध्ये अयोध्येतील श्रीराममंदिरानंतर प्रचंड भीतीचे वातावरण ! (Fear In Bangladeshi HINDUS)

शेख हसीना सरकार निष्क्रीय असल्याचा हिंदूंचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – अयोध्येत श्रीराममंदिरामध्ये भगवान श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून देश-विदेशांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. असे असले, तरी भारताच्या शेजारी असणार्‍या बांगलादेशातून अयोध्येत येण्याचे कुणी धाडस दाखवले नाही, असे समोर आले आहे. बांगलादेशात काही दिवसांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी हिंदूंवर आक्रमणे झाली होती. ‘जर अयोध्येत जाऊन श्री रामललाचे दर्शन घेतले, तर आमच्यावर आक्रमणे होतील’, अशी तेथील हिंदूंना भीती वाटत आहे.

या संदर्भात येथील ढाकेश्‍वरी आणि रमण काली मंदिरात कार्यरत असणारे रूहीदास पाल म्हणाले की, २२ जानेवारीनंतर येथील वातावरण चांगले नाही. मला पत्नी आणि मुली यांच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. मला नातेवाइकांना भेटायला कोलकात्याला जाता येत नाही.

  • ‘बांगलादेशात हिंदूंची संख्या पुष्कळ अल्प असून ते कायम असुरक्षित आहेत. –  रामेन मंडल, सरचिटणीस, ढाकेश्‍वरी मंदिर
  • ‘आम्ही सत्तेत आलो, तर मंदिरे पाडू आणि मशिदी बांधू’, असे अनेक धर्मांध धमक्या देत आहेत; पण सरकार गप्प आहे. – मेघ मल्हार बसू, विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मौलानांनी मिरवणूक काढू दिली नाही !

रमण काली मंदिराचे अध्यक्ष उत्पल साहा यांनी सांगितले की, २२ जानेवारीला जेव्हा श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालू होती, तेव्हा मौलानांनी ‘येथे मिरवणूक काढू नये’, अशी धमकी दिली होती. ‘आपले मंदिर किंवा घर जाळले जाईल’, अशी भीती येथील हिंदूंना वाटत होती. ‘बांगलादेश जमात -ए- इस्लामी पार्टी’ बांगलादेशातील हिंदूंवर सर्वाधिक नाराज आहे. हिंदूंची मंदिरे पाडणे त्यांच्यासाठी सामान्य आहे. एवढे मोठे मंदिर भारतात बांधले; पण बांगलादेशी हिंदू असल्यामुळे आणि येथील मंदिराचा अध्यक्ष असल्याने माझ्या मनात भीती आहे. वर्ष १९९३ मध्ये बाबरी विध्वंसानंतर हिंदूंवर झालेली आक्रमणे आणि हिंसा येथे रहाणार्‍या लोकांना आजही आठवते. सध्याच्या अवामी लीग सरकारच्या राज्यात ही स्थिती आहे, विरोधी पक्ष सत्तेत आल्यास काय होणार ?

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशाने स्वतःला इस्लामी देश घोषित केले नसले, तरी तेथील बहुसंख्य मुसलमान हिंदूंचा वंशसंहार करत आहेत. याविषयी भारत सरकारने जसा पाकिस्तानला कधी जाब विचारला नाही, तर बांगलादेशालाही कधी विचारला नाही. तेथील हिंदूंसाठी सरकार कधी आवाज उठवणार ?
  • बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताची घनिष्ठ संबंध असले, तरी तेथील हिंदूंचे रक्षण त्या करतांना दिसत नाहीत. अशा संबंधांचा हिंदूंना काहीच लाभ नाही, हे लक्षात घ्या !