सकल हिंदु समाजाच्या वतीने शोभायात्रा !
कोल्हापूर – अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ जानेवारीला सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय झाली होती. करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करून बिंदू चौक येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, सीता यांच्या वेशभूषेतील भाविक, रामभक्तांची प्रचंड गर्दी यांमुळे सर्वत्र प्रचंड उत्साह जाणवत होता.
मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेशमंदिर, महाद्वार रस्ता, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामार्गे दसरा चौकात शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेत अयोध्या येथील श्रीराममंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. शोभायात्रा महाद्वार रस्त्यावर आल्यावर ‘व्यापारी असोसिएशन’च्या वतीने रस्त्यावर दोन्ही बाजूंना पणत्या लावून स्वागत करण्यात आले. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने श्रीरामरक्षा पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेत भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक, सौ. शौमिका महाडिक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इचलकरंजीत दुमदुमला ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा घोष !
इचलकरंजी – येथे श्री काळामारुति आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीरामाचा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत पालखी, रथ यांसह भगव्या साड्या, फेटे, टोप्या परिधान करून रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेत आमदार प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. भंडार्याची उधळण करत होणार्या धनगरी ढोलच्या वादनामुळे उपस्थितांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे दिसत होते. गावभागातील राम जानकी मंदिरात पोचल्यावर महाआरतीने शोभायात्रेची सांगता झाली.