श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा
मुंबई – अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामाचा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भू-वैकुंठामध्ये अवतरणार आहेत. श्रीरामांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त व्हावी, तसेच ज्या कारसेवकांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान देऊन श्रीरामजन्मभूमी मुक्त केली, त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करायला व्हावी, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ राबवले जात आहे. यामध्ये श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, श्रीरामाचा गुणगौरव केला जात आहे.
मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारीपासून चालू झाले आहे. मंदिरे, कार्यालये, रहिवासी संकुलामध्ये हे अभियान होत असून भाविकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीरामाचे नामस्मरण करताना आनंद होत असल्याचे भाविकांनी सांगितले. ‘प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता सर्व भारतवासियांना लागली आहे’, असे या वेळी जाणवले. मुंबईत घाटकोपर, बोरिवली, भोईवाडा आणि नवी मुंबईत ऐरोली, नेरूळ, घणसोली या ठिकाणी, तसेच पालघर जिल्ह्यात वसई, बोईसर येथे अभियान राबवले गेले.