थोडक्यात महत्वाचे : पुणे विद्यापिठामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप तथ्यहीन….शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीसह ८ जणांना अटक….जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पुणे विद्यापिठामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप तथ्यहीन ! – विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

 पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या कुलगुरूंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विद्यापिठाचे अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी केला होता; मात्र ‘हे आरोप तथ्यहीन आणि निराधार आहेत. विद्यापिठाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यांनी अशा प्रकारे विद्यापिठाची प्रतिमा मलीन करण्याचा केलेला प्रयत्न संतापजनक आणि खेदकारक आहे. विद्यापीठ प्रशासन यांचा निषेध करते’, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने प्रसिद्ध केले आहे. विद्यापिठाचे अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी विद्यापिठामध्ये काही प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करून आर्थिक अपव्यवहार आणि अनियमितता झाली असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले होते; मात्र विद्यापीठ प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.


पुणे येथील शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीसह ८ जणांना अटक !

पुणे – येथील शरद मोहोळ यांच्या हत्या प्रकरणी साहिल उपाख्य मुन्ना पोळेकर याच्यासह ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ येथून या आरोपींना कह्यात घेण्यात आले आहे, तसेच आक्रमणाच्या वेळी वापरण्यात आलेली हत्यारे आणि दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भूमी आणि पैसे यांच्या जुन्या वादातून ही हत्या केल्याचे प्राथमिक अन्वेषणात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.

भूमी आणि पैसे यांच्या जुन्या वादातून हत्या केल्याचे प्राथमिक अन्वेषणात उघड !


अहिल्यानगर येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आणि निषेध !

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम मांसाहारी होते’, असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्याचा निषेध म्हणून ‘विश्व हिंदू परिषद’ आणि बजरंग दल’ यांनी संगमनेर येथील नवीननगर रस्त्यांवरील चौकांमध्ये आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी ‘आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी त्यांना त्वरित अटक करण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली.


ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील वरिष्ठ आधुनिक वैद्य ३० दिवस सक्तीच्या रजेवर

ठाणे, ६ जानेवारी (वार्ता.) – येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी भरती करण्यावरून वरिष्ठ आधुनिक वैद्य संजय बर्नवाल यांचा निवासी आधुनिक वैद्याशी वाद झाला. बर्नवाल यांनी आधुनिक वैद्याला शिवीगाळ करत त्याच्यावर आक्रमण केल्याची घटना घडली होती. महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णालय अधिष्ठात्यांकडून अहवाल मागवला होता. अहवालानुसार प्रशासनाने बर्नवाल यांना ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांचा पदभार अन्य वरिष्ठ आधुनिक वैद्यांकडे  सोपवण्यात आला असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली.


जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ३ ठिकाणी गुन्हे नोंद !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम यांना मांसाहारी संबोधल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे, शिर्डी आणि मुंबई येथे ३ वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (ए) अंतर्गत आव्हाड यांच्याविरोधात ‘एफ्.आय.आर्.’ प्रविष्ट करण्यात आला आहे. आव्हाड यांनी श्रीरामावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी क्षमा मागितली आहे.


भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर पुणे येथे गुन्हा नोंद !

पुणे – येथील ससून रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात एका पोलीस कर्मचार्‍याला कानशिलात लगावल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍यालाही मारहाण केली होती.