Arif Mohammed Khan : मुख्यमंत्री विजयन् यांचा माझ्यावर आक्रमण करण्याचा कट ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

  • केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचा गंभीर आरोप

  • राज्यपाल खान यांच्या वाहनाला धडकले होते अन्य वाहन !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान व केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी मला शारीरिक दुखापत करण्याचा कट रचला आहे, असा गंभीर आरोप केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केला. राज्यपाल खान यांंचे चारचाकी वाहन विमानतळाकडे जात असतांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकपाची) विद्यार्थी शाखा असलेल्या ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांच्या वाहनाने राज्यपालांच्या गाडीला धडक दिली होती. या घटनेनंतर राज्यपाल खान यांनी थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांवर वरील आरोप केला.

या धडकेच्या घटनेनंतर राज्यपाल खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या माणसांना मला दुखापत करण्यासाठी पाठवले होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि घटनात्मक मूल्ये यांची पायमल्ली होत आहे. एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चालू असेल आणि तिथे आंदोलकांच्या गाड्या आल्या, तर पोलीस त्या गाड्यांना कार्यक्रमस्थळी जाऊ देतील का ? मुख्यमंत्र्याच्या गाडीजवळ कुणालाही जाऊ दिले जाईल का ? येथे मात्र पोलिसांनी तसे करू दिले. आंदोलकांच्या गाड्या उभ्या करून पोलिसांनीच त्यांना आत ढकलले आणि तिथून पळ काढू दिला. आंदोलकांनी केवळ मला विरोध केला नाही किंवा काळे झेंडे दाखवून ते शांत बसले नाहीत, तर त्यांनी दोन्ही बाजूंनी माझ्यावर आक्रमण केले. त्यानंतर मी माझ्या वाहनातून उतरलो; पण ते (आंदोलक) तिथून पळून का गेले ? ते कळले नाही. ते सगळे एकाच गाडीत बसून आले होते, हे पोलिसांना ठाऊक होते.

संपादकीय भूमिका

साम्यवाद्यांचा इतिहास आणि वर्तमान पाहिले, तर त्यांच्याकडून अशा घटना घडवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यपालांच्या हा आरोपाची केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे !